फडणवीस नाही तर फसणवीस सरकार – खा. श्री अशोक चव्हाण

0
492
Google search engine
Google search engine

शेतक-यांच्या प्रचंड प्रतिसादात ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्य सरकारची कर्जमाफी फसवू असून सरकार खोटी आकडेवारी जाहीर करून शेतक-यांची फसवणूक करित आहे. कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असून राज्यातील सर्व शेतक-यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

सरकारच्या फसव्या कर्जमाफी विरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून आज बुलढाणा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी माझी कर्जमाफी झाली नाही या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर एल्गार सभेत काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांना संबोधीत करताना खा. अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा जनतेच्या समोर आला असून ‘एक ही भूल कमल का भूल’ असे राज्यातले शेतकरी म्हणू लागलेत. सरकारने जाहीर केलेली आकडेवारी अतिरंजीत आणि खोटी असून चुकीचे आकडे दाखवून सरकार जनतेची फसवणूक करित आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी 34 हजार कोटींची नसून फक्त 5 हजार कोटींची आहे. फक्त 15 लाख शेतक-यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतक-यांना या कर्जमाफीची लाभ मिळाला नाही आणि ज्यांचा सातबारा कोरा झाला नाही अशा राज्यभरातील सर्व शेतक-यांच्या स्वाक्ष-या असलेले अर्ज जमा करून ते बैलगाडीतून नेऊन मुख्यमंत्र्यांना देणार आहे. सरकारने 30 जून 2017  पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफी द्यावी. राज्यातल्या सर्व शेतक-यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत काँग्रेस पक्ष हा लढा सुरुच ठेवेल असे खा. चव्हाण म्हणाले. सरकारचा खोटेपणा उघड झाल्याने संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी भाडोत्री गुंडाना सोबत घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली व त्यांनतर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. खा. चव्हाण यांनी सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. तत्पूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन जीएसटी कायद्यातील जाचक नियमांबाबत चर्चा केली. काँग्रेस पक्ष शेतक-याप्रमाणे व्यापा-यांसोबत असून जीएसटी कायद्यातील जाचक नियमांबाबत व्यापा-यांचे प्रश्न काँग्रेस सरकारपुढे मांडेल असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना दिले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणणीस अॅड. गणेश पाटील माजी मंत्री अब्दुल सत्तार आ. सुभाष झांबड, आ. एम. एम. शेख माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शाम उमाळकर, राम विजय बुरुंगले, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.