खरीप हंगाम पीक कर्ज वितरणासाठी सुलभ पीक कर्ज अभियान राबविणार – सहकार मंत्री सुभाष देशमुख

0
1199
Google search engine
Google search engine

        मुंबई :- 
 राज्यातील आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या 14 जिल्हा सहकारी बँकांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज वाटप करण्यासाठी ‘सुलभ पीक कर्ज अभियान २०१७’ राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      सुलभ पीक कर्ज अभियानात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
श्री. देशमुख म्हणाले की, राज्यातील 14 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. या बँकांकडे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी निधीची कमतरता असली तरी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपयांचे कर्ज देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका आणि व्यापारी बँकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या बँका कर्ज वितरणासाठी विकास सोसायट्यांची मदत घेतील असेही त्यांनी सांगितले.
            सुलभ पीक कर्ज अभियानांतर्गत व्यापारी बँकेची शाखा असलेल्या गावात पीक कर्ज मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. सदर मेळाव्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जाचे अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व गटसचिव यांची मदत घेण्यात येत आहे. आजतागायत १६ जिल्ह्यात एकूण ७७० शेतकरी मेळावे घेण्यात आले असून त्यामध्ये २९ हजार ५५५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी २८ हजार ५३० शेतकऱ्यांचे कर्जाचे अर्ज संबंधित व्यापारी बँकांकडे सादर करण्यात आले असल्याचेही सहकारमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            राज्यातील सद्यस्थितीत झालेल्या कर्जवाटपाची माहिती देताना सहकारमंत्री म्हणाले की, आत्तापर्यंत राज्यात ८ हजार ३३२ कोटींचे कर्ज १३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांमध्ये वितरीत करण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना सहकार्य करण्याचे निर्देश राष्ट्रीय तसेच व्यापारी बँकांना देण्यात आले आहेत. बँकांकडे कर्जपुरवठा करण्यासाठी पैसे असतानाही कर्ज देण्याबाबत बँका टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा बँकांवर कडक कारवाई करण्याचा इशारादेखील श्री. देशमुख यांनी दिला.
                     शेतकऱ्यांच्या अडचणीवर उपायांसाठी मोफत हेल्पलाइन
शेतकऱ्यांना सहजरितीने कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी शासनामार्फत योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत. शिवाय या प्रक्रियेत शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या तर त्यांच्या शंका आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनामार्फत १८००२३३०२४४ ही मोफत हेल्पलाईन सुरु करण्यात आली असल्याची माहिती सहकारमंत्र्यांनी यावेळी दिली.