चांदुर रेल्वे तालुक्यात भाजपामध्ये राजकीय ‘भुकंप’ तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे

0
790
Google search engine
Google search engine

शासनाच्या तालुकास्तरीय समित्या अजुनही गठीत नाही

बेंबळा प्रकल्पातील समस्यांबाबत आढावा बैठक न घेतल्यामुळे व इतर मुद्द्यांवर नाराजी
पालकमंत्री प्रविण पोटे व गुहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे दुर्लक्ष ??


चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान)

केंद्रात तसेच राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतांना सुध्दा चांदुर रेल्वे तालुक्यात भाजपामध्ये राजकीय ‘भुकंप’ आला आहे. बेंबळा प्रकल्पातील चांदुर रेल्वे तालुक्यातील ८ गावे गेल्या अनेक वर्षांपासुन नागरी सुविधेपासुन वंचित असुन याबाबत पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आढावा बैठक घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तसेच शासनाच्या तालुकास्तरीय समित्या अजुनही गठीत न केल्यामुळे व तालुक्यातील इतर मुद्द्यांवर नाराज झालेले भाजपा तालुका सरचिटणीस संदिप सोळंकेसह ५ पदाधिकारी व एका जेष्ठ कार्यकर्त्याने बुधवारी भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.

     प्राप्तमाहितीनुसार शासनाच्या तालुकास्तरीय समित्या गठीत न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचलले आहे. भाजपाचे शासन आल्याबरोबर जर तालुका स्तरावरील समित्या गठीत केल्या असत्या तर ५०० कार्यकर्त्यांना समितीमध्ये सामावुन घेतले गेले असते. त्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असते. यामुळे जिल्ह्यात जिल्हा परीषदेच्या काही सर्कलचे उमेदवार पराभुत झाले नसते व जिल्हा परीषद भाजपाच्या ताब्यात आली असती. तसेच चांदुर रेल्वे नगर परीषदमध्ये सुध्दा भाजपाचा पराभव झाला नसता. तसेच भाजपा शासन येऊन अडीच वर्ष झाले परंतु चांदुर रेल्वे येथे पालकमंत्री- कार्यकर्ता सोबत अधिकारी यांची एकही आढावा बैठक घेतलेली नाही. १० जुनला सुध्दा कार्यकर्त्यांचे म्हणणे पुर्णत: ऐकुन घेतले नाही. गेल्या २ वर्षात राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी १०-१५ वेळा पालकमंत्री प्रविण पोटे व जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांना बेंबळा प्रकल्पातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा (बु.), घुईखेड, येरड, टिटवा यांसह ८ गावे नागरी सुविधेपासुन वंचित असुन अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणाकडे जावे हा प्रश्न निर्मान झाला आहे.  याव्यतिरीक्त चांदुर रेल्वे तालुक्यामध्ये भाजपाचा आमदार नसतांना जास्त निधी द्यायला पाहिजे होता मात्र तसे झाले नाही. भाजपाच्या शासनामध्ये कामे होत नसल्याने मतदारांची पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर नाराजी आहे. असे पुढेही राहिल्यास येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी ही भाजपाच्या ताब्यात राहणार नाही. तसेच गृहराज्यमंत्री रणजितजी पाटील हे निवडुण गेले तेव्हापासुन त्यांनी एकही दौरा चांदुर रेल्वे येथे केला नाही. त्यामुळे त्यांनी  कार्यकर्ते व पदाधिकारी वाऱ्यावर सोडले. 
     सदर सर्व बाबी रास्त असुन राजीनामा देणाऱ्यांनी पक्षासाठी खुप कष्ट केले आहे. परंतु आता मतदारांची नाराजी होत असल्यामुळे भाजपा तालुका सरचिटणीस संदिप सोळंके,  घुईखेड पं.स. सर्कल प्रमुख प्रशांत देशमुख, आमला पं.स. सर्कल प्रमुख सचिन होले, राजुरा पं.स. सर्कल प्रमुख समीर भेंडे व जेष्ठ कार्यकर्ते मुरलीधर मुंधडा यांनी बुधवारी भाजपा ग्रामिण जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांना भेटुन राजीनामा सोपविला आहे. यांच्या निवेदनानंतर भाजपातर्फे कोणत्या हालचाणी होणार हे येणारा काळच सांगेल. मात्र  केंद्रात व राज्यात सत्ता असतांनासुध्दा भाजपामध्ये तालुक्यात राजकीय ‘भुकंप’ आला ऐवढे मात्र नक्की. या राजीनामाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना पाठविण्यात आल्या आहे.

८ दिवसा समित्या गठीत न झाल्या कार्यकर्त्यांचे राजीनामे ??


शासनाच्या तालुकास्तरीय समित्या गठीत न झाल्यामुळे सद्यास पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. मात्र येत्या ८ दिवसांत या समित्या गठीत न झाल्यास तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सुध्दा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता जिल्हाध्यक्षांना याबाबत तत्काळ पाऊल उचलने गरजेचे आहे. अन्यथा तालुक्यात भाजपाला मोठे नुकसान होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही.