पालकमंत्र्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – कायदा व सुव्यवस्थेत हयगय खपवून घेणार नाही – पालकमंत्री श्री प्रवीण पोटे-पाटील

0
564

अमरावती –

आगामी सणांचा काळ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्याचा काटेकोर प्रयत्न करावा. सामाजिक शांततेला बाधा पोहोचविण्याचा किंवा नियमभंगाचा प्रकार कुठेही घडल्यास कठोर कारवाई करावी. कायदा व सुव्यवस्थेत हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे दिले.
आगामी काळातील सार्वजनिक गणेशोत्सव, बकरी ईद आदी सणांच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर व जिल्हा पोलीसांची विशेष बैठक पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

 
आगामी सणांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांनी यावेळी घेतला. शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करावी. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले. ते म्हणाले की,
सण-उत्सवाचा आगामी काळ पाहता सुरक्षितता राखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेत. नियमभंग करणारांवर कडक कारवाई करावी. तडीपार गुंड परत येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. संभाव्य गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधित कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालावा. अवैध दारु, जुगार, गुटखा विक्री, घरफोडी, गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करावी. शहरातील वेलकम पॉईंट येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा.
ते पुढे म्हणाले की, समाजातील शांतता अबाधित राहणे आवश्यक आहे.कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीसांनी आपले कार्य करावे. नियमांप्रती सामाजिक जागृती वाढविण्याचा प्रयत्न करावा. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याबरोबरच समाजात सलोखा, बंधुभाव वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.