समृद्धी महामार्गासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील 5. 29 हेक्टर जमीनीची खरेदी शेतक-यांचा मोबदला तत्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा

0
954
Google search engine
Google search engine

अमरावती-

 

नागपूर- मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती अर्थात समृद्धी महामार्गासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा व खंबाळा येथील आठ शेतक-यांनी आपल्या संमतीसह 5.29 हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला खरेदी करुन दिली. त्यासाठी 1 कोटी 29 लाख 63 हजार 954 रुपयांचा मोबदला शेतक-यांच्या खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे तत्काळ जमा करण्यात आला.
विभागीय आयुक्त पीयुष सिंह व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या नियंत्रणात ही सर्व प्रक्रिया सुलभ व पारदर्शकरीत्या पार पडली.
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलविण्याची क्षमता असलेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाला यामुळे गती येणार आहे. 710 कि. मी. लांबीच्या या महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी 73.37 कि. मी. इतकी आहे. त्यात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आदी तालुक्यांचा समावेश आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा व खंबाळा या गावातील 8 शेतक-यांनी आपली जमीन सरळ खरेदीने राज्य रस्ते विकास महामंडळास खरेदी करुन दिली. त्यात धोत्रा येथील शेतकरी महेंद्र गंगाराम गजभिये यांना 0.79 हेक्टर जमीनीसाठी 21 लाख 5 हजार 615 रुपये, तसेच खंबाळा येथील शेतकरी हेमंत पंडीतराव देशमुख यांना 1.02 हेक्टर जमीनीसाठी 24 लाख 38 हजार 543 रुपये, अमोल नरेश जळीत यांना 1.10 हेक्टर जमीनीसाठी 26 लाख 29 हजार रुपये, जानराव शामराव सोनोने यांना 0.84 हेक्टर जमीनीसाठी 20 लाख 7 हजार 600 रुपये, प्रभाबाई सुभाषराव पंडीत यांना 0.12 हेक्टर जमीनीसाठी 2 लाख 92 हजार 575 रुपये, रवींद्र अंबादास ढाकुलकर यांना 0.60 हेक्टर जमीनीसाठी 14 लाख 56 हजार 163 रुपये, भीमराव पंजाबराव लोहकरे यांना 0.67 हेक्टर जमीनीसाठी 16 लाख 59 हजार 925 रुपये, अशोक पंजाबराव लोहकरे यांना 0.15 हेक्टर जमीनीसाठी 3 लाख 74 हजार 533 रुपये इतका मोबदला देण्यात आला.
समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदी करुन देणा-या शेतक-यांनी मोबदल्याबाबत समाधान व्यक्त केले. शासनाने जमीनीचा पाचपट मोबदला दिला आहे. हा महामार्ग शेतक-यांसाठी समृद्धी निर्माण करणारा आहे, अशी भावनाही व्यक्त केली. प्रशासनाने संवादक टीमच्या माध्यमातून शेतक-यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना मिळणारा मोबदला व या महामार्गाचे महत्व समजावून सांगितले. त्यामुळे शेतक-यांनी स्वत: संमती देऊन शासनास जमीन खरेदी करुन दिली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विनोद शिरभाते यांनी दिली.