युद्धासाठी सिद्ध रहा ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

0
585
Google search engine
Google search engine

शत्रू सीमेवर कुरापती करत असतांना भारतीय शासनकर्ते सैन्याला असा आदेश का देत नाहीत ?

 

बीजिंग – भूतान, भारत आणि चीन यांच्या सीमेवरील डोकलाम तिठ्यावरून भारत अन् चीन यांच्यामध्ये चालू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने डोकलामच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव चालू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘युद्धासाठी सिद्ध रहा’, असा आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या सैन्याला दिला आहे. चीनचे सैन्य ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला ९० वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून चीनने उत्तर चीनमध्ये ३० जुलैला सैनिकी शक्तीप्रदर्शन केले. या वेळी त्यांनी हा आदेश दिला. ‘मला दृढ विश्‍वास आहे की, आमच्या वीर सैन्यामध्ये सर्व शत्रूंना पराभूत करण्याचे साहस आणि क्षमता आहे’, असेही जिनपिंग म्हणाले.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिल्यांदाच चीनच्या उत्तरेकडील भागात सैन्याची पाहणी केली. या वेळी त्यांनी सैनिकी वेष परिधान केला होता. चीनचा सैन्यदिन १ ऑगस्टला असतो. या दिवशी सैन्य संचालन करण्याची वर्ष १९४९ पासूनची परंपरा आहे; मात्र ही परंपरा मोडित काढून २ दिवस आधीच सैन्य सामर्थ्याचे संचालन करण्यात आले. या संचालनामध्ये अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, पारंपरिक लढाऊ विमाने, २० स्टेल्थ विमाने आदींचा समावेश होता.