जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र दोन वर्षांत दुष्काळमुक्त – श्री फडणवीस

0
852
Google search engine
Google search engine

पानी फाऊंडेशनच्या कामाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) –  जल,जंगल आणि जमीन यांचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो. पानी फाऊंडेशनचे काम या दृष्टीने महत्त्वाचे असून महाराष्ट्र सरकार त्यासाठी संपूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

यावेळी फडणवीस म्हणाले, “मनात आणल्यावर एखादा माणूस काय करू शकतो, हे आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तर सर्वांनी एकजुटीने काम केल्यास काय होऊ शकते, हे तुम्ही दाखवून दिले आहे. वॉटर कपने जलयुक्त शिवारला नवे स्वरूप दिले आहे आणि महाराष्ट्रात नवी क्रांती आणली आहे. महाराष्ट्रात पाण्यापेक्षा मोठे काम असू शकत नाही.” या स्पर्धेत भाग घेतलेल्या गावकऱ्यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “तुम्ही सर्व शक्तिमान आहात. गेल्या वर्षी तीन तालुक्यात ही स्पर्धा घेतल्यानंतर यंदा त्यात ३० तालुक्यांचा समावेश करण्यात आला. पुढच्या वर्षी  १०० तालुक्यांचा समावेश करा. गावांनी असेच कार्य केले, तर दोन वर्षांत म्हणजे २०१९ पर्यंत महाराष्ट्र जलयुक्त दिसेल.” पानी फाऊंडेशनला पूर्ण सहकार्याचे आश्वासन देताना ते म्हणाले, “राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे.त्याचे प्रतीक म्हणून सरकारच्या वतीने आम्ही ६.५ कोटींची बक्षीसे जाहीर करत आहोत. ही योजना जनतेची झाली म्हणून यशस्वी झाली, अन्यथा अन्य सरकारी योजनांप्रमाणे ती कागदावर राहिली असती.जल, जंगल व जमिनीचे संरक्षण केले तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर परत कर्जमाफीची वेळ येणार नाही.”याकामी प्रत्यक्ष सहभाग देणाऱ्या सेलिब्रिटीजचेही त्यांनी आभार मानले. यावेळी व्हिडियोद्वारे संवाद साधताना आमिर खान म्हणाले, “एवढ्या गावांतून या प्रसंगी लोक आलेत,याचा आनंद आहे. हे सगळे काम तुमच्या मेहनतीचे फळ आहे. यावर्षी तुम्ही जी कमाल केली आहे ते पुढील वर्षी आणखी मोठे करू.” पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ म्हणाले, “आपण सर्वांनी मिळून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे. हे धाडसी स्वप्न आहे. त्यासाठी आपल्या सर्व क्षेत्रातील लोकांची वज्रमूठ करावी लागेल. आज एक नवीन पर्व सुरू होत आहेत. या स्पर्धेने एक दाखवून दिले आहे, की ध्येयवेड्या माणसांना बिचारे म्हणण्याचा काळ संपुष्टात आला आहे.” शाहरूख खान यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस व आमिर खान यांचे कौतुक केले. फडणवीस यांनी महाराष्ट्रात पाण्याची स्थिती सुधारण्याचा ध्यास घेतला आहे, असे ते म्हणाले. “मी खरे तर कार्यक्रमाला पाहुणा म्हणून आलो होतो, परंतु मला आज तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. विचार कितीही मोठा असो, त्याच्यामागे मेहनत नसेल तर त्यात काही अर्थ नाही. तुम्ही खरे हिरो आहात आणि एकतेपेक्षा जास्त शक्ती अन्य कशातही नाही. लोक काहीही म्हणत असले तरी आपल्या देशात खूप एकता आहे, हे मला येथे शिकायला मिळाले,” असे ते म्हणाले.

यावेळी माण (जि. सातारा) तालुक्यातील बिदाल आणि केज (जि. बीड) तालुक्यातील पळसखेडा या गावांना २० लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. खटाव (जि. सातारा) तालुक्यातील भोसरे आणि धारूर (जि. बीड) तालुक्यातील जायभायेवाडी या गावांना ३० लाख रुपयांचे दुसरे बक्षीस विभागून देण्यात आले. तर आर्वी (जि. वर्धा) तालुक्यातील काकडदरा या गावाला ५० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.  पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप २०१७ स्पर्धेचा पारितोषिक वितरण फडणवीस यांच्या हस्ते बालेवाडी येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान, राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ,रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी, जमनादेवी बजाज ट्रस्टचे राजीव बजाज, टाटा ट्रस्टचे आर.वेंकट, पिरामल फाऊंडेशनचे अजय पिरामल, एचडीएफडीसीच्या झिया लालकाका  प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान व किरण राव हे आजारी असल्यामुळे त्यांनी व्हिडियोद्वारे संपर्क साधला. यावेळी नीता अंबानी, बजाज, वेंकट आणि झिया लालकाका यांनीही मनोगते व्यक्त केली. अभिनेता जीतेद्र जोशी व अभिनेत्री सोनाली जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.