​सण, उत्सवाच्या काळात पोलिसांनी प्रशासन व जनता यामधील समन्वय साधावा – जिल्हाधिकारी

0
827
Google search engine
Google search engine

यवतमाळ :- 
पुढील आठवड्यापासून जिल्ह्यात सण आणि उत्सवाला सुरुवात होणार आहे. हे सण शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातारणात पार पाडण्यात पोलिसांची मोठी जबाबदारी  असते. त्यामुळे या काळात पोलिसांनी  प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधून आपले कार्य पार पाडावे, अशा सुचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिल्या.

सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.

जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांवर जास्त लक्ष ठेवून कार्य करावे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, कोणतेही समाजविघातक कृत्य लोकांकडून होणार नाही, यासाठी पोलिसांनी दक्ष असावे. मिरवणुकीच्या काळात विसर्जनाच्या वेळी पाण्यात वाहून जाणे, इलेक्ट्रिक शॉक लागणे किंवा सेल्फी काढतांना पाण्यात पडणे आदी घटनेतून व्यक्तिचा मृत्यु होण्याची शक्यता असते. त्यामुळे या बाबींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. मिरवणुकीच्या मुख्य रस्त्यावर काही अतिक्रमण असल्यास ते काढून रस्ता मोकळा करावा. मिरवणुक नियोजित रस्त्यावरून शांततेत पार पडेल, याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मुर्ती स्थापनेपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. धर्मदाय आयुक्तांमार्फत नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरु झाली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी त्वरीत नोंदणी करावी. 

जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने पोलिस स्तरावर शांतता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या समित्यांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधावा. शांतता समित्या अधिक परिणामकारक बनविण्यावर जोर द्यावा. समाज कंटकांवर लक्ष ठेवून त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करावी. असे कार्य करतांना कोणत्याही दबावाल बळी पडू नये. तसेच परिसरातील अवैध धंद्यांना आवर घालावा आदी सुचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनीसुध्दा पोलिसांना मार्गदर्शन केले. 

यावेळी जिल्ह्यातील पोलिस उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.