​उत्तम रस्तेनिर्मितीतून विकासप्रक्रियेला गती:-  पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

0
505
Google search engine
Google search engine


अमरावती : जिल्ह्यातील अनेक गावे रस्त्यांनी जोडून विकासप्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून खेड्यापाड्यांमध्ये उत्तम रस्ते होत आहेत. यंदा जिल्ह्यात 544 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.   

          मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यातील कमळजापूर ते भिलटेक या रस्त्याच्या दर्जा सुधारणेच्या कामाचे भूमीपूजन श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार रामदास तडस, आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, कार्यकारी अभियंता श्री. जवंजाळे आदी यावेळी उपस्थित होते.

          श्री. पोटे- पाटील म्हणाले की, जिल्ह्यात 160 कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांची अनेक कामे होत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक गावे जोडली जात आहेत. जुन्या रस्त्यांच्या दर्जात सुधारणा होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून केंद्र शासनाकडूनही जिल्ह्यात मोठे रस्ते निर्माण होत आहेत. ही रस्तेनिर्मिती गुणवत्तापूर्ण असावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विविध योजना, प्रकल्पांची अंमलबजावणी होत असताना नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून विकासप्रक्रिया गतिमान होते.

          शासनाच्या लोकाभिमुख योजनांमुळे गावांमध्ये अनेक अनुकुल बदल होत आहेत, असे श्री. तडस यांनी सांगितले. येथील गावांना उत्तम रस्ता उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री. जगताप यांनी पालकमंत्र्यांचे मनोगतातून आभार मानले. कार्यक्रमाला स्थानिक परिसरातून नागरिकांची मोठी उपस्थिती होती.