श्री कृष्णाजी अवधुत महाराज देवस्थानात ७१ फुट  उंच झेंड्यांना नविन खोळ – पदस्पर्श न करता चरणदास कांडलकर नी चढविली खोळ

0
2256

रमना व चंदनउटीचा कार्यक्रम
दसऱ्याचा निमित्ताने  सावंगा विठोब्यात भरली यात्रा

चांदूर रेल्वे / शहेजाद खान – 

 

संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द असलेले चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील कृष्णाजी महाराज देवस्थानात
दसऱ्याचा  दिवशी अवधुत बुवा यांच्या समाधीवर नवीन चादर चढविणे, रमना व चंदनउटीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
झाला. ७१ फुट  उंच दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा भव्य दिव्य कार्यक्रम अखंड भजनाच्या गजरात उत्साहात पार
पडला. यावेळी हजारो भक्तांनी श्री कृष्णाजी अवधुत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
तिनशे वर्षापूर्वी श्री कृष्णाजी अवधुत महाराज यांनी सावंगा विठोबा येथे अवधुती संप्रदायाची स्थापना केली. समानेतेची
शिकवण देत देव व भक्ताना समान दर्जा दिला. त्याचे प्रतिक मंदिरात ७१ फुट उंच दोन झेंडे आहेत. कृष्णाजी महाराज
यांचे अवधुती भजन लिखीत नसले तरी परंपरने भक्ताच्या मुखगत असून समाज प्रबोधन करणारे आहेत. प्रत्येक अमावश्येला
देवस्थानामध्ये चंदनउटीचा कार्यक्रम घेण्यात येतो. दसऱ्याचा  दिवशी श्री कृष्णाजी अवधुत महाराज यांची समाधी व
झेंड्यांना चंदनउटीचा कार्यक्रम घेण्यात आला. केशर, अष्टगंध, दही, दुध, शहद, तुप, तीळ, अत्तर, कस्तुरी यांचे मिश्रण
करून चंदन खोड घासून चंदनउटी तयार करण्यात आली. या चंदन उटीचे गडवे, कापुर ज्योत, महापुजा ताट, हाराची
फुलारी, स्वच्छ पाण्याचा घडा, धुपारणे, अगरबत्ती व गलप आदी साहित्याने देवस्थान विश्वस्तांनी दसऱ्याचा दिवशी सकाळी
चंदनउटी कार्यक्रमाला सुरूवात केली. प्रथम कृष्णाजी महाराज यांची समाधी, ईश्वर पुनाजी व भक्तांची समाधी, देव व भक्ताचे
समानतेचे झेंडे, लहान मंदिर व मोठे मंदिरात स्नान घालून चंदन उटीने पुजा करून अवधुत महाराजाच्या समाधीवर नवीन
चादर चढविण्यात आली. पानाचा विडा व साखर, सुपारी ठेवून व पुष्पहार, पुष्प अक्षता अर्पण करून सामुहिक आरती घेण्यात
आली. यावेळी अखंड कापूर ज्योत प्रज्वलन व सामूहिक अवधूती भजनाची मांड सुरू होती. सुमारे अडीच तास ही पूजा
विधी शिस्तीत पार पडली. दुपारी साडेचार वाजता समानतेचे प्रतिक ७१ फुट दोन झेंडयाना ५० मिटर कापडापासून
शिवलेली नवीन खोळ चढविण्याचा कार्यक्रमाला सुरूवात झाली. अवधुत भक्त चरणदास कांडलकरांनी स्नान करून नवीन
वस्त्र परिधान केले. प्रथम अवधुत महाराजाच्या समाधीचे दर्शन घेतले आणि झेंड्याला पदस्पर्श न करता कोणत्याही सेफ्टी
उपकरणाशिवाय मोठ्या दोरखंडाच्या साह्याने जुनी खोळ काढत टोकावर पोहचले. जुनी खोळ काढत, बांधलेले दोरखंड
हळूहळू सोडवून नवीन खोळ खाली सरकवित चढविली. तब्बल दोन तास हा चित्तथरारक धार्मिक विधी चालला. हजारोंनी
अविस्मरणीय क्षण डोळयात तर अनेकांनी कॅमेऱ्यात कैद  केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठोबा देवस्थान अध्यक्ष
गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष हरिदास सोनवाल, सचिव वामनराव रामटेके, कृपासागर राऊत, दिनकर मानकर, दत्तुजी
रामटेके, रूपसिंग राठोड, विनायक पाटील, पुंजाराम नेमाडे, दिगांकर राठोड, अनिल बेलसरे, स्वप्निल बबनराव चौधरी
यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

आता कृष्णाजी महाराज देवस्थान चे संकेतस्थळ 


श्री कृष्णाजी अवधुत महाराज देवस्थानाची नवीन संकेतस्थळ  तयार करण्यात आली असुन त्याचा शुभारंभ विश्वस्तांच्या
प्रमुख उपस्थितीत दसऱ्याचा  मुहूर्तावर करण्यात आले. www.sawangavithoba.org या मार्गिकेवर पाहता येईल.
मंदिर, मंदिरात कसे पोहचता येईल, देवस्थानचा इतिहास, संपर्क  होणारे विविध धार्मिक विधीची
माहिती वेबसाईडवर पाहता येणार आहे.