भारतीय जनता पार्टी पुन्हा नं. १, पनवेलमध्ये भाजपा विजयी, भिवंडी – मालेगावमध्ये संख्याबळ वाढले

0
1016
भारतीय जनता पार्टी पुन्हा नं. १




मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राज्यामध्ये पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकांसह विविध ठिकाणी झालेल्या पंचायत समिती, नगरपंचायती व नगरपरिषद निवडणुकांमध्ये शुक्रवारी भारतीय जनता पार्टी पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पनवेलमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले तर भिवंडी आणि मालेगावमध्ये भाजपाचे संख्याबळ चांगले वाढले आहे. निवडणुकीतील यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले.

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला २६ मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत असतानाच मतदारांनी पुन्हा एकदा भाजपाला निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविला आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी मतदारांना पसंत पडल्यामुळेच भाजपाला सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. त्यांनी सांगितले की, नव्याने निर्माण झालेल्या पनवेल महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले त्याबद्दल भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांचे व स्थानिक कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो. भिवंडी महानगरपालिकेत गेल्या वेळच्या आठ जागांच्या तुलनेत भाजपाने यावेळी मित्रपक्षांसह २९ जागा जिंकल्या आहेत. त्याबद्दल भाजपा ठाणे विभाग अध्यक्ष खा. कपिल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो. मालेगाव महापालिकेत भाजपाने खाते उघडले असून नऊ जागा जिंकल्या आहेत. मालेगावमध्ये भाजपाचे संख्याबळ चांगले वाढले आहे. ते म्हणाले की, विदर्भात अमरावती जिल्ह्यात धारणी पंचायत समिती भाजपाने दहापैकी आठ जागा जिंकून ताब्यात घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड नगरपरिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष विजयी झाला तसेच भाजपाने १७ पैकी नऊ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात रेणापूर नगरपंचायतीत भाजपाने १७ पैकी आठ जागा जिंकल्या असून तेथे भाजपाचाच नगराध्यक्ष होईल. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा नगरपंचायतीतही सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाचा नगराध्यक्ष निवडून येईल. ते म्हणाले की, पंचायत ते पार्लमेंट भाजपा नंबर वन ठरला असून त्याच पद्धतीने या निवडणुकीतही मतदारांनी कौल दिला आहे. भाजपा मतदारांची आभारी आहे.