आरक्षणाचा लाभ किती घ्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे ! – भैयाजी जोशी

0
624
Google search engine
Google search engine

भोपाळ –

 

जे अधिकारी आरक्षणाचा लाभ घेत आहेत, त्यांनी स्वतःच ठरवावे की, कधीपर्यंत याचा फायदा घ्यायचा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. बढतीमधील आरक्षणाविषयी मध्यप्रदेश सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भैयाजी जोशी यांनी हे विधान केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समस्या समोर ठेवून आरक्षणाची तरतूद (प्रावधान) केली होती. जोपर्यंत समाजाला याची आवश्यकता आहे, तोपर्यंत याचा फायदा घेतला जावा. आरक्षणामुळे अधिकार्‍यांत मतभेद असता कामा नये’, असे जोशी म्हणाले.

भैयाजी जोशी यांनी मांडलेली इतर सूत्रे

१. शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाचा योग्य भाव मिळत नसल्याने अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यांच्या पिकांचे योग्य भाव ठरवण्यासाठी आणि ते खरेदी करण्यासाठी योग्य व्यवस्थेची आवश्यकता आहे. कर्जमाफी हा पर्याय नाही. शेतकर्‍यांना ते स्वतः कर्ज फेडू शकतील एवढे सक्षम बनवले पाहिजे.

२. अर्थव्यवस्थेविषयी सरकारने जनतेच्या सूचनांवर लक्ष दिले पाहिजे. सरकारने विनाकारण कडक वागू नये. अर्थव्यवस्थेच्या सुधारणेविषयी देशभरात चर्चा आहे. त्यानुसार सरकारने योग्य ती पावले उचलावीत.

३. एन्सीआर् (देहली) भागातील फटाकेबंदीवर भैयाजी जोशी यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. सर्व फटाके प्रदूषण करणारे नसतात. आपण अनेक वर्षे दिवाळी साजरी करत आहोत. यावर तुलनात्मक उपाय शोधला पाहिजे अन्यथा उद्या ‘दिवाळीत दिवे प्रज्वलित केले, तरी त्यामुळे प्रदूषण होते’, असे म्हटले जाईल.