गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची प्रभावी अंमलबजावणी करा – श्री ए. एस. आर. नायक जिल्हाधिकारी

0
644


गडचिरोली – 

 शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास मंजूरी प्रदान केली. या अंतर्गत असणाऱ्या कामांना गती दयावी असे निर्देश जिल्हाधिकारी ए . एस . आर. नायक यांनी दिले आहेत. या सोबतच मामा तलाव दुरुस्तीची कामे देखील पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. 
जिल्हाधिकारी नायक यांनी गेल्या 2 दिवसात वडसा, कुरखेडा, गडचिरोलीत तालुक्यात सुरु असणाऱ्या कामांना भेटी देवून या कामांच्या प्रगतीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे,सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर हे होते. 
वडसा तालुक्यातील पोटगाव येथे असणाऱ्या मामा तलावातून गाळ काढला जावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. याच गावात पूर्ण झालेल्या सिंचन विहिरीची त्यांनी पाहणी केली. जिल्हयात विशेष मोहिमे अंतर्गत 11 हजार विहिरी बांधण्यात येत आहेत. ज्यांच्या विहिरींचे काम पूर्ण झाले आहे, अशा शेतकऱ्यांची यादी त्यांच्या शेताच्या क्षेत्राच्या नोंदीसह उपविभाग स्तरावर एकत्रित करण्यात यावी आणि या संर्वांपैकी इच्छूकांना वीज जोडणीसाठी प्रयत्न करावेत असे नायक म्हणाले. 

मजूरांशी संवाद साधला 

कोरेगांव ग्रामपंचायत अंतर्गत गावालगत असणाऱ्या साठवण तलावांची पाहणी करुन जिल्हाधिकारी नायक यांनी येथील रोजगार हमीच्या मजुरांशी संवाद साधला. या ठिकाणी साधारण 1200 स्त्री/पुरुष मजूर कामासाठी तयार आहेत. त्यापैकी 200 जणांच्या मस्टरची अडचण सोडविण्यात यावी असे निर्देश चर्चेअंती त्यांनी दिले. या ठिकाणी जुलै अखेरपर्यंत रोहयोचे काम देण्याची मागणी येथील मजूर स्त्रियांनी केली. 
चिखली गावानजिक वन विभागातर्फे खोदण्यात आलेल्या वन तळयासही जिल्हाधिकारी नायक यांनी भेट दिली. यावेळी येथील वन अधिकारी चांदेकर यांनी याबाबत माहिती दिली. तळयामुळे वन्य जीवांना जंगलाच्या आतच पाणीसाठे उपलब्ध होणार आहेत. मात्र त्यांना पाण्यापर्यंत जाणे येणे शक्य व्हावे यासाठी पायरीवजा रचना गरजेची आहे. पूर्ण झालेल्या अशा सर्व वन तळयांमध्ये अशी व्यवस्था करण्यासाठी 2017-18 च्या जिल्हा नियोजन मंडळ निधीतून मदत करु, आपण प्रस्ताव सादर करा, या प्रकारच्या सूचना नायक यांनी यावेळी दिल्या. 
गडचिरोली नजिक असणाऱ्या पारडी येथील जलसंधारणाच्या विविध कामांची पाहणी नायक यांनी केली. कृषी विभाग, तहसीलदार, बांधकाम तसेच पाटबंधारे आदी विभागांच्या तालुकास्तर अधिकाऱ्यांची बैठक येथील उपविभागीय कार्यालयात घेऊन त्यांना ” गाळमूक्त धरण व गाळयुक्त शिवार ” ची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या. गाळ शेतात टाकल्याने शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे यात अधिकाधिक लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन नायक यांनी केले आहे.