मोर्शी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय सलाईनवर ! – कृषी विभागाच्या रिक्त पदाकडे शासनाचे दुर्लक्ष !

0
1269
Google search engine
Google search engine

 

तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे !

तालुक्यातील सर्व योजनांचा भार अवघ्या २८ कृषी सहाय्यकांकडे !

 

रुपेश वाळके / दापोरी प्रतिनिधी /

 

कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेले शेतकरी, आत्महत्यांचे न संपणारे सत्र असे चित्र एकीकडे मोर्शी तालुक्यात असताना , दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या मोर्शी तालुक्यातील कृषी विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाणवा आहे.

शेतकर्‍यांसाठी देशभर वेगवेगळी आंदोलने, यात्रा निघत असतानाच दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी अधिकार्‍यांच्या पदरिक्ततेमुळे शेतकरी बांधवांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मोर्शी तालुका कृषी अधिकारी व मोर्शी , नेर , रिद्धपुर या तीन कृषी मंडळामध्ये मंडळ अधिकाऱ्यांसह 21 जागा रिक्त आहेत. यात मंडळ कृषी अधिकार्यांच्या ३ पैकी ३ जागांचा प्रभारी अधिकाऱ्यांकडे पदभार असून कृषी सहाय्यकांचा ९ रिक्त जागांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ह्या जागा रिक्त असल्याने शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासुन वंचीत राहत आहेत. एकूण ६७ पदांपैकी ४६ पदे भरलेली असून २१ पदे रिक्त आहेत. मोर्शी तालुक्यात एकूण ६७ पदांपैकी 21 पदे रिक्त असल्यामुळे आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे. मात्र मोर्शी तालुक्यातील कृषी विभाग सलाईनवर असल्याचे चित्र दिसत आहे.

मोर्शी तालुक्यात तालुका कृषी कार्यालय असुन या कार्यालयात अधिकारी मात्र शेतकऱ्यांना सापडत नसल्याने कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासुन वंचित रहावे लागत आहे. तरीही याकडे कोणतेही वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध कामाच्या अडचनिंना समोर जावे लागते.

तालुक्यात विविध शासकीय कार्यालय आहेत. परंतु बऱ्याच विभागाचे अधिकारी कार्यालयात नसतात. अशातच शहरातील तालुका कृषी अधिकारी प्रभारी असल्याने त्यांचे मंडळ अधिकारी आणि कृषी सहायक यांच्यावर कुठलेच वचक राहिलेले नाही. या कार्यालयातील कर्मचारी आप आपल्या सोईनुसार कामावर येतात. तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळत नाही. कारण जबाबदार अधिकारी कार्यालयात नसल्याने बाकी कर्मचारीही दिसत नाहीत. या कार्यालयात हा लपन छुपनीचा खेळ बऱ्याच दिवसापासुन चालत आहे. या कार्यालयातील बहुतांश कर्मचारी मुख्यालयी न राहता एस.टी. बसच्या वेळापत्रकानुसार येणे जाणे करत असतात. या कार्यालयात कोन केव्हा येतो व कोन केव्हा जातो याचा मात्र पत्ता लागत नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांनी चौकशी केली असता साहेब बैठकीला जिल्ह्यावर गेले आहेत. व कृषी सहाय्यक खेड्याला साईडवर गेले असे सागण्यात येते.

शेतीच्या कामासाठी महत्वाची असणारी तालुका कृषी अधिकारी १ , मंडळ कृषी अधिकारी १, कृषी सहाय्यक ९ , वरिष्ठ लिपिक १ , लिपिक २, अनुरेखक ४ , वाहन चालक १, शिपाई ३, अशी महत्वाची पदे देखील रिक्त आहेत. सरकारने एखाद्या कृषी योजनेचा आढावा घ्यायचे ठरवले किंवा शेतकऱ्यांपर्यंत नवीन योजना पोहोचविण्याचे ठरवले तरी देखील आज मितीला सरकारकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना ज्ञान देण्याची कोणतीही योजना आज सरकारजवळ नाही. परिणामी यावर्षी दुष्काळ होऊनही शेतकऱ्यांना ‘राम भरोसे’ सोडण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे

 

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अपडाउनमुळे लाभार्थी त्रस्त 

 

कार्यालयातील अधिकारी आजुबाजुच्या परीसरातुन अप-डाऊन करतात. यांना कार्यालयात येण्यासाठी वेळ होतो . कार्यालययात दुपार नंतर ग्रामीण भागातील गावांना भेट देण्याचे कारण सांगून कार्यालया बाहेर पडतात. यांच्या या लहरी कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी कार्यालयात आणि कर्मचारी आपल्या शहराकडे असा प्रकार पहावयास मिळत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी अनेक महत्वपूर्ण योजना राबवित आहेत. पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. यामुळे या कार्यालयाविषयी तालुक्यातून शेतकरी वर्ग तिव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुका कृषी कार्यालयातील प्रभारी राजमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त राहिली नाही. त्यामुळे शासनाने कृषी विभागातील रिक्त पदे भरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला शिस्त लावून दररोज कार्यालयात वेळेवर हजर राहण्याची सक्ती करावी जेणेकरून शिस्तबद्ध प्रमाणे कार्यालय चालेल व शेतकऱ्यांचे कामे वेळेवर होतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे .