जनतेच्या तक्रारीस प्राधान्य देवून तात्काळ सोडवाव्यात — ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
1296
Google search engine
Google search engine
हिंगोली –
 दैनंदिन जीवनातील वीज अत्यंत महत्वाचा घटक असून, वीजेशिवाय कोणताचा विकास होऊ शकत नाही. महावितरण कंपनीवर सुरळीत वीज पुरवठा करण्याची अतिमहत्वाची जबाबदारी असून, अधिकारी-कर्मचारी यांनी जनतेचे तक्रारीस प्राधान्य देवून तात्काळ सोडविण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील महावितरण व महापारेषणच्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी बैठकीस आमदार तान्हाजी मुटकुळे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कळमनुरी नगराध्यक्ष श्री. शिंदे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, महावितरणचे विभागीय संचालक संजय ताकसांडे महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना शाश्वत वीज देण्याची शासनाची भूमिका असून राज्यात शेतकऱ्यांना सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ सुरु करण्यात येणार आहे. विविध उपयोजनेसाठी हिंगोली जिल्ह्यासाठी 198 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच महापारेषण अंतर्गत बाराशिव, आखाडा बाळापूर आणि कुरुंदा 175 कोटी खर्च करुन जिल्ह्यात 132 के.व्ही. मोठे वीज केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात कृषी वाहिनीवरील 11 फिडर सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन असुन, यामुळे शेतकऱ्यांना दिवसातून 12 तास वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारी जमिनी किंवा शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भाड्याने घेण्यात येणार आहे.
राज्यात मागील वर्षात 3 लाख 10 हजार वीज जोडण्या देण्यात आल्या असून, प्रलंबित कृषी वीज पंप वीज जोडण्यांचा अनुशेष देखील लवकरच दूर करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला स्वतंत्र लाईनमन पाहिजे असल्यास गावातीलच इलेक्ट्रिक विषयातून आयटीआय, तंत्रनिकेतन प्रशिक्षण पुर्ण घेतलेल्या उमेदवारास वीज व्यवस्थापक म्हणून घेता येणार आहे. महावितरणने आणलेल्या मोबाईल अँपचे केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी कौतुक केले आहे. ग्राहकांनी सुद्धा याचा वापर केल्यास गतिमान सेवा मिळण्यास मदत होणार आहे. नगरपंचायती व ग्रामपंचायतीच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या नळयोजना आणणार असून हे सर्व प्रकल्प जनतेच्या सहकार्याने पूर्णत्वास जातील असा विश्वास ऊर्जामंत्री यांनी व्यक्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतांना बावनकुळे म्हणाले की, अवैध दारु विक्री विरोधात मोठी लढाई सुरु करण्यात येणार आहे. अवैध दारु दुकानाबाबत तक्रार प्राप्त होताच 12 तासात त्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
यावेळी बैठकीस महावितरण, महापारेषण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.