सरदार वल्लभभाई पटेल हे निपक्ष शासन व्यवस्थेचे जनक – जिल्हाधिकारी

0
1285
Google search engine
Google search engine


• जिल्हा परिषदेत राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवस साजरा

भंडारा:-

देशाच्या विकासासाठी निपक्ष शासन व्यवस्था असावी हा विचार करणारे व व्यवस्था निर्माण करणारे वल्लभभाई पटेल हे निपक्ष शासन व्यवस्थेचे जनक आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. आपल्या बाणेदार निर्णयामुळे सगळया जगाला परिचित असलेल्या स्व. इंदिरा गांधी यांच्या बाणेदार निर्णयामुळेच भारतात सर्वाधिक वाघ दिसतात, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, एकता दिवस हा दररोज साजरा करण्याचा विषय आहे. स्वातंत्र्य लढयातील सरदार पटेल यांचे नेतृत्व गुण ओळखून महात्मा गांधी यांनी त्यांना सरदार ही पदवी दिली. कोणत्यावेळी काय निर्णय घ्यायचा व देश हिताची भूमिका घ्यायची हे कसब त्यांच्या अंगी होते.
आपणही सरदार पटेल यांच्यातील नेतृत्व गुणांचा अंगिकार केल्यास सामान्य माणसाची सेवा करता येईल. आपल्या देशाला शेकडो वर्षाची संस्कृती आहे. या देशात अनेक महापुरुष जन्मले आहेत. त्यांचे विचार आपल्या पिढीवर रुजविण्याचे काम आपल्याला करावे लागेल असे ते म्हणाले. स्व. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात जगाच्या राजकारणावर परिणाम सोडणारे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या बाणेदार निर्णयामुळेच देशात वाघ मोठया संख्येने आढळतात.
यावेळी बोलतांना भाग्यश्री गिलोरकर म्हणाल्या की, सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांनी देशाला प्रगती पथावर नेले. आज खऱ्या अर्थाने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. या महान नेत्यांचा एक विचार जरी अंगिकारला तर तीच खरी श्रध्दांजली ठरेल. 562 संस्थांचे विलिनीकरण हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा निर्णय देशाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणारा होता. त्यामुळेच भारत एकसंघ राहू शकला, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले. दुरदृष्टी असलेला नेता, करारी स्वभाव व निर्णयक्षमता यामुळेच त्यांना लोहपुरुष म्हंटले जाते, असे ते म्हणाले.
वैभवी पाटील या विद्यार्थीनींनी एकात्मतेवर एकपात्री प्रयोग सादर केला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले