जळगाव येथे १४५ वर्षांची परंपरा लाभलेला प्रभु श्रीरामाचा रथोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला

0
646
Google search engine
Google search engine

जळगाव  –

 

१४५ वर्षांची परंपरा लाभलेला आणि संपूर्ण भारतात कार्तिक प्रबोधनी एकादशीस एकमेव असा होणारा श्रीराम रथ-वाहनोत्सव अपूर्व उत्साहात रामनामाच्या गजरात पार पडला. कान्हादेशातील वारकरी संप्रदायातील संत अप्पा महाराज यांनी वर्ष १८७२ मध्ये रथोत्सव उत्सवाला प्रारंभ केला होता. कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा ते दशमीपर्यंत प्रतिदिन १२ दिवसांची वाहने सिद्ध करणे, कार्तिक प्रबोधिनी एकादशीस श्रीराम रथयात्रा, द्वादशीस श्रीकृष्णाचे रासक्रिडीचे वाहन करणे, श्री तुलसी विवाह आणि वैकुंठ चतुर्दशीचा फुलांचा महादेव (हरिहर भेट) आणि त्रिपुरारी पौर्णिमेस चातुर्मास समाप्ती, पालखी दिंडी नगरप्रदक्षिणा, गोपालकाला, सत्यनारायण पूजा आणि अन्नसंतर्पण होऊन उत्सवाची सांगता होते.

१. या कालावधीत अश्‍व (घोडा), ऐरावत (हत्ती), व्याघ्र, शार्दुल, गजेंद्र मोक्ष, सरस्वती, शेषनाग, चंद्र, सूर्य, गरूडराज आणि रामभक्त मारुतिराय यांची वाहने निघतात. हा वाहनोत्सव विविध प्राणी आणि देवता यांचा आदर्श समाजाला देतो. एकादशीला प्रभु श्रीरामाचा रथ निघतो, द्वादशीस श्रीकृष्णाच्या रासक्रीडेच्या वाहनाने रथ-वाहनोत्सवाची सांगता होते.

२. रथोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मुसलमान समाजाची वाजंत्री. मुसलमान या उत्सवात वाजंत्री वाजवून रथाचे स्वागत करतात. संत लालखाँ मिया आणि सद्गुरु आप्पा महाराज या संतद्वयींचा स्नेह होता. अनेक वर्षांपासून आजपावेतो संत लालखाँ मिया यांच्या समाधीस्थानाजवळ रथ काही वेळ थांबतो आणि रथोत्सव समितीच्या वतीने येथे चादर अर्पण करण्यात येते.

३. रथमार्गावर देवीसारखे रूप करून पुरुष भाविक रथापुढे नाचत असतात.

रथोत्सवास उपस्थित संत आणि मान्यवर : सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, तसेच ब्रह्मवृंद, पुरोहित, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नामदार, आमदार, महापौर, नगरसेवक, शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांसह रामभक्त.