चांदुर रेल्वे तालुक्यातील मुख्य रस्ते उखडले <> अमरावती, धामणगाव, तिवसा, वर्धा रस्त्यांची दुर्दशा – संबंधित विभाग व लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष

0
878
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे :- (शहेजाद  खान) 

चांदुर रेल्वे शहरातून बाहेरगावी जाणारे सर्व प्रमुख रस्ते गेल्या अनेक महिन्यांपासून उखडले असून त्याकडे संबंधित विभागासोबत लोकप्रतिनिधींचे ही कमालीचे दुर्लक्ष होत असतांना दिसून येत आहे.
चांदुर रेल्वेतुन अमरावती, धामणगाव, नांदगाव, तिवसा, व वर्धा या प्रमुख शहराकडे रस्ते जातात. या मुख्य रस्त्यांमुळे शहराची आर्थिक व सामाजिक नाळ जुळली आहे. परंतु तालुक्यातील इतर ग्रामीण भागातील रस्ते गेल्या 2 वर्षा पासून खराब झाले असतांनाच  मुख्य रस्त्यांचीही पूर्णतः दुर्दशा झाली आहे. रस्ते, इमारती व पूल हेच राष्ट्र विकासाचे पहिले पाऊल असे ब्रीद वाक्य असतांना तालुक्यातील प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. तिवसा रोड चांदूर ते कुऱ्हा पर्यंत नादुरुस्त असून नागपूर या उपराजधानीकडे जायला शहरातील व्यापारी वर्ग व इतरांना जायला प्रचंड मनस्ताप होतो. तसेच अमरावती कडे जाणारा  रोड ही कधी नव्हे तो प्रचंड खराब झाला आहे. पोहरापर्यंत या रस्त्याचे हाल बेहाल आहे तर धामनगावकडे जाणारे दोन्ही मार्ग फुटले आहे. त्यामुळे पंधरा मिनिटांचे अंतर कापायला एक तास लागत आहे.  नांदगाव रस्ता तर बारमाही खराब राहतो. विशेष म्हणजे इतर शहरात चांगले डांबर रस्ते फोडून सिमेंटिकरण सुरु असतांना चांदूर रेल्वे मतदारसंघाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या मुख्य रस्त्यांशिवाय तालुक्यातील राजुरा, सांगुलवाडा, धनोडी, सातेफळ, घुईखेड, कारला, अमदोरी इत्यादी अनेक गावातील रस्ते उखडले असून संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. यामुळे दुचाकीसह, चारचाकी वाहनधारकांचे हाल होत असून त्यांना विविध आजाराला पुढे जावे लागत आहे. तरी संबधित विभागाने या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.