संभाजीनगर येथे ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ पुरोहितांनी बंद पाडला

0
770
Google search engine
Google search engine

राज्यभर ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या विरोधात उद्रेक !

पुरोहित वर्गाकडून पैठण येथे ‘दशक्रिया विधी’ बंद ठेवून चित्रपटाचा निषेध !

दशक्रिया विधीच्या निमित्ताने केवळ ब्राह्मण समाजच सहभागी होत नाही, तर समाजात अन्य घटकही उदा. मडकी बनवणारा कुंभार, तिरडी विकणारा बुरूड, केस कापणारा नाभिक, फुले विकणारा माळी, तांदुळ विकणारा वाणी, असे बारा बलुतेदार सहभागी असतात. असे असूनही या चित्रपटात अपप्रकार दाखवतांना केवळ एकाच समाजघटकाला लक्ष्य केले गेले आहे, हे जातीजातींत भेद पाडण्यासारखे आहे. आज कधी नव्हे एवढी हिंदू ऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना अशा प्रकारचे चित्रपट निर्माण करणे आणि एका समाजाला गावातून पिटाळून लावल्याचे दाखवणे, हे सामाजिक अराजकाला आमंत्रण देण्यासारखे आहे. यासाठी जातीजातींत फूट पाडणार्‍या आणि ब्राह्मणद्वेष पसरवणार्‍या या चित्रपटाचा वैध मार्गाने निषेध व्हायला हवा. – संपादक

संभाजीनगर – ‘दशक्रिया’ या वादग्रस्त मराठी चित्रपटाच्या विरोधात ‘प्रोझोन मॉल’ येथील चित्रपटगृहात पुरोहितांनी निदर्शने करून या चित्रपटाचा खेळ बंद पाडला. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा चित्रपट परत चालू करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही. राज्यात विविध ब्राह्मण संघटना, पुरोहित संघटना यांच्याकडून या चित्रपटास तीव्र विरोध होत असून अनेक निदर्शने, पोलीस-प्रशासन यांना निवेदने देण्यात येत आहेत.

या चित्रपटाविषयी राज्यातील अन्य घडामोडी –

१. पैठण येथे ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या विरोधात ब्राह्मण समाजाने आंदोलन चालू केले आहे.  येथील पुरोहित वर्गाने येथे होणारे ‘दशक्रिया विधी’ बंद ठेऊन या चित्रपटाचा निषेध केला.

२. पुणे शहरात बहुतांश चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे; मात्र कोथरुड येथील ‘सिटी प्राईड मल्टिप्लेक्स’ने चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला.

सांगली शहरातील दोन्ही चित्रपटगृहांमध्ये आज खेळ दाखवले गेले नाहीत, अशी माहिती ब्राह्मण संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.

३. नालासोपारा येथील ‘मिराज’ या चित्रपटगृहात एका पुरोहिताने पुढाकर घेऊन एकट्याने विरोध केला. त्यानंतर चित्रपटगृह मालकांनी हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला.

४. ‘या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी’, या मागणीचे निवेदन पैठण ब्राह्मण महासभेच्या वतीने पैठण येथील पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. संभाजीनगर येथील क्रांतीचौकात ब्राह्मण समाज समन्वयक समितीच्या वतीने या चित्रपटाचा तीव्र निषेध करण्यात आला, तर मराठवाड्यातही ठिकठिकाणी या चित्रपटाला ब्राह्मण संघटनांचा विरोध होत आहे. नाशिक येथे सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने १७ नोव्हेंबरला ‘सिनेमॅक्स’मध्ये निदर्शने करण्यात आली, तसेच ‘हा चित्रपट प्रदर्शित करू नये’, अशी मागणी चित्रपटगृहाच्या संचालकांकडे करण्यात आली.

५. कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाने या चित्रपटास विरोध दर्शवला असून या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.