64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण ‘कासव’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान

0
624
नवी दिल्ली-: 
64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते आज विज्ञान भवनात एका शानदार कार्यक्रमात करण्यात आले. ‘कासव’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासह ‘दशक्रिया’या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘सायकल’, ‘व्हेंटिलेटर’, ‘आबा ऐकताय ना ?’ या मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाले असून मराठी मोहर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयात ठळक दिसून आली.
64 व्या भव्य राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्यावतीने करण्यात आले. या पुरस्कार प्रदान सोहळयास केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडु, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे सचिव राजीव गोबा, तसेच विविध श्रेणीतील चित्रपट निवड मंडळाचे प्रमुख मंचावर उपस्थित होते. दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
के. विस्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
भारतातील सर्वात प्रचलित चित्रपट निर्मित्यापैकी के. विस्वनाथ यांचे नाव मोठया मानाने घेतले जाते. श्री विस्वनाथ यांच्या निर्मित चित्रपटांमधून सामाजिक प्रश्न, संस्कृती तसेच समृद्ध पंरपरेचे भान जपले जायचे. त्यांनी चित्रपट सृष्टीत साउंड डिजाइनर म्हणून सुरूवात केली होती. श्री विस्वनाथ यांना आतापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यातआले. यासह 20 वेळा त्यांना नंदी बार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. के. विस्वनाथ यांना स्वर्ण कमळ, 10 लाख रूपये रोख प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुरभी सी.एम. यांना ‘मिन्नामिनुनगु द फायरफ्लाय’ या मल्याळम चित्रपटासाठी तसेच उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अक्षय कुमार यांना ‘रूस्तम’ या हिंदी चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. यावर्षी अव्यावसायिक तसेच व्यावसायिक चित्रपटांना अनेक ‘विशेष उल्लेखनिय’ पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.
देशभरातील विविध भाषेतील चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘कासव’ या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. या चित्रपटाची निर्मिती मोहन आगाशे, सुमित्रा भावे आणि सुनिल सुकठनकर यांनी केलेली आहे. पुरस्कार स्वरूपात प्रत्येकाला स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीमध्ये मराठी भाषेसाठी ‘दशक्रिया’ या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. दिग्दर्शक संदीप पाटील आणि रंगनील क्रीयेशन यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाला दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘दशक्रिया’ या चित्रपटासाठीच सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार प्रसिद्ध चरित्र अभिनेते ‘मनोज जोशी’ यांना प्रदान करण्यात आला. रजत कमळ आणि 50 हजार रूपयें रोख असे पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यातआले. या चित्रपटाच्या संहिता लेखनासाठी ‘संजय पाटील’ यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट संहितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, श्री पाटील यांना रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले.
राजेश मापुसकर दिग्दर्शीत ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये बाजी मारली आहे. या चित्रपटास सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार राजेश मापुसकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात त्यांना स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले. या चित्रपटासाठीच सर्वोत्तम संपादनासाठी ‘रामेश्वर’ यांना तर सर्वोत्तम ‘पुन:रिकॉर्डींग व फायनल मिक्सींग’साठी ‘आलोक डे’ यांना प्रत्येकी 50 हजार रूपये रोख आणि रजत कमळाने गौरविण्यात आले.
‘सायकल’ या मराठी चित्रपटातील वेष-भुषाकारासाठी सचिन लोवलेकर यांना रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अव्यावसायिक चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली ‘आबा ऐकताय ना ?’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार आदित्य जांभळे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना स्वर्ण कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले.
‘हम चित्र बनाते है’ हा सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन चित्रपट ठरला असून मुंबई आयआयटीच्या आयडीसी विभागाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यासाठी रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट ‘प्लासेबो’च्या निर्मित्या अर्चना फडके यांना तर दिग्दर्शन अभय कुमार यांना रजत कमळ आणि 50 हजार रोख देऊन गौरविण्यात आले.
साहसी /शोध या श्रेणीतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार ‘मातीतील कुस्ती’ ला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणीत देशमुख यांनी केलेले आहे. माधवी रेड्डी यांनी निर्मिती केली आहे. यासाठी प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रोख असे प्रदान करण्यात आले.