मतदार संघातील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून अपूरा निधी – पत्रपरिषदेत आमदार श्री जगताप यांचा आरोप

0
697
Google search engine
Google search engine

वेळोवेळी मागणीकडूनही रस्त्यांसाठी निधी नाही
सर्वाधिक ३० टक्के मुख्य रस्ते असलेल्या मतदार संघासाठी केवळ ३ कोटीचा निधी

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

 

जिल्ह्यात मतदार संघानिहाय जि.प.व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख जिल्हा मार्ग
रस्त्यांची टक्केवारीत धामणगाव विधानसभा क्षेत्रात २९.८८ टक्के म्हणजे सर्वात जास्त असूनही केवळ
३ कोटीचा निधी मिळाल्याने मतदार संघातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यासाठी राज्य सरकारचे
उदासीन धोरण जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप धामणगाव विधानसभा मतदार संघाचे
आ.प्रा.वीरेंद्र जगताप यांनी स्थानिक विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषेदला जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाने, नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने
उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना आ.जगताप म्हणाले की, वृत्तपत्रातून सतत चांदूर रेल्वे, धामणगाव
रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडल्याचे व त्याच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधीचे
दुर्लक्ष होत असल्याच्या बातम्या येत आहे. परंतु मतदार संघातील कोणत्याच कामाकडे दुर्लक्ष नसुन
समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहो. मतदार संघातील रस्त्याच्या दुर्दशा असून त्यांच्या
दुरूस्तीसाठी सतत मागणी व प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण राज्यातील रस्ते खड्डे युक्त झाल्याची स्थिती आहे.
ह्यासाठी राज्य सरकारचे धरसोडीचे धोरण कारणीभूत आहे. शासनाने मागील ४/६ महिण्यात बांधकामा
संबंधी वेळोवेळी ३० शासन निर्णय काढून निर्णयामध्ये बदल केल्याने कामांच्या निविदा पुर्ण होवू शकल्या
नाहीत. अनेक निविदा रद्द करून पुन्हा काढाव्या लागल्यात, ह्यात शासनाचा वेळ व पैसा वाया गेलेला
आहे. मुख्य रस्त्यांची जिल्ह्यात मतदार संघानिहाय टक्केवारी काढलेली असून बडनेरा मतदार संघात
९.६१ टक्के, अचलपूर मतदार संघात १४.९५ टक्के, मोर्शी मतदार संघात १६.३२ टक्के, तिवसा मतदार
संघात १२.०२ टक्के, दर्यापूर मतदार संघात १७.२२ टक्के व धामणगाव रेल्वे मतदार संघात २९.८८
टक्के असे जि.प.व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य मार्गाचे रस्ते आहेत. असे असतांना सर्वात जास्त
रस्त्यांची टक्केवारी असलेल्या धामणगाव मतदार संघाला राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ ३ कोटीचा
निधी दिला तर उर्वरीत मतदार संघनिहाय १२ कोटीचा निधी दिलेला आहे. त्यामूळे धामणगाव मतदार
संघावर हा अन्याय झालेला असल्याचे आ.जगताप यांनी सांगीतले. काँग्रेसच्या सत्ताकाळात राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांना हा रस्त्यांच्या टक्केवारीची बाब लक्षात आणुन दिली होती. त्यानुसार निधी देण्याची मागणी करून मतदार संघातील रस्ते गुळगूळीत केले होते. परंतु आताचे पालकमंत्री यांनी समान निधीचे धोरण सांगुन सर्व मतदार संघाला सारखा निधी वाटत आहे. त्यामुळे सर्वाधिक रस्त्यांची टक्केवारी असतांना मतदार संघात निधी अभावी रस्त्यांची कामे होवू शकलेली नाही. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी शासनाकडून अतिरिक्त निधी खेचून आणून आपली क्षमता सिध्द करावी असे जगताप यांनी यावेळी म्हटले. सा.बां.विभागाचे हे  रस्ते असुन दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेला कोणताच निधी मिळालेला नाही. पावसाळ्यानंतर खड्डे भरण्याचा निर्णय वार्षिक दुरूस्ती कार्यक्रमातंर्गत २ वर्षेपर्यंत कामे करण्याचा करार आहे. यानुसार जिल्ह्यात सर्व प्रथम धामणगाव मतदार संघात मंजुर कामांचे टेंडर झालेत. परंतु सरकारच्या जीएसटी गोंधळ व त्यामूळे कंत्राटदारांचा कामे न करण्याचे असहकार आंदोलनामूळे कामे सुरू झाली नाहीत. वार्षिक देखभाल दुरूस्तीचे कामे सुरू न केल्याने परत दोन तीन वेळा टेंडर झालीत, परंतु कामे घेण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. सध्या चांदूर रेल्वे-तळेगाव, चांदूर रेल्वे-कुऱ्हा , चांदूर रेल्वे-पळसखेड या रस्त्यांची खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. समृध्दी मार्गासाठी ५० हजार कोटी ,बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटी, अमरावती शहरातील चांगले डांबरी रस्ते खोदुन काँक्रीट रस्ते करण्यासाठी कोट्यावधी खर्च करीत
असतांना ग्रामीण भागातील रस्ते व खड्डे भरण्यासाठी मात्र सरकारकडे निधी नाही. शेतकऱ्यांचा  कर्जमाफीसाठी आमदारांनी या कामासाठी निधीचा आग्रह कमी केला.परंतु कर्जमाफीही नाही ना ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती झालेली नाही. हेच ते अच्छे दिन असल्याचा टोला आ.जगताप यांनी लगावला.