सामान्यांच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ‘हल्लाबोल’ पदयात्रा : खासदार सुप्रिया सुळे

0
822
Google search engine
Google search engine

यवतमाळ :-

राज्यातील सरकार हे खोटारडे आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार शेतकऱ्यांची, महिलांची, कामगारांची, कष्टकऱ्यांची, अंगणवाडी सेविकांची, प्रत्येक सामान्य माणसाची फक्त फसवणूक करत आहे. त्यामुळे सामान्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ‘हल्लाबोल’ पदयात्रा काढत आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केले. १ ते ११ डिसेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात येणाऱ्या पदयात्रेसंबंधी माहिती देण्यासाठी यवतमाळ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , माजी मंत्री आ. मनोहर नाईक, आ. ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, माजी महिला प्रदेश अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, सोशल मीडिया प्रभारी आनंद पराजपे  आदी उपस्थित होते.

 

उद्या १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ येथे ‘आरंभ सभा’ होईल. त्यानंतर ‘हल्लाबोल’ पदयात्रा सुरू होणार आहे. या पदयात्रेत पक्षातील सर्व नेते सहभागी होणार आहेत, असे सुळे यांनी प्रामुख्याने नमूद केले.

 

तीन वर्षांपासून हे सरकार सत्तेत आहे. पण सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी तयार केलेल्या ‘मी लाभार्थी’च्या जाहिराती खोट्या निघाल्या. आमच्या कार्यकर्त्या डिजिटल गावात गेल्या तर तेथे साधा फोनही लागत नव्हता. कार्ड पेमेंट साठी कोणतेही मशीन नव्हते. इतर जाहिरातींची देखील तीच गत आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारने सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी करण्याचा गाजावाजा केला. पण प्रत्यक्षात १० रुपयांची तरी कर्जमाफी झाली आहे का? असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. ‘हे सरकार गरीब माणसाची चेष्टा करत आहे. कर्जमाफी तर सरकारने केली नाहीच. त्यात आता कुठे चांगला पाऊस पडला, तर सरकारने शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडायला सुरुवात केली. ही माणुसकी आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कर्जमाफी फसवी असल्याचे उघड होऊ लागल्यानंतर सरकारने त्याचा दोष एका अधिकाऱ्यावर टाकला. कर्जमाफीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता का? अशा निर्णयांना अधिकारी जबाबदार नसतानाही त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. मुख्यमंत्री जर खरंच पारदर्शक कारभार चालवत असतील तर त्यांनी याबाबत पारदर्शक कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.
शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत राष्ट्रवादी लढा देत राहणार. १२ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथे भव्य सभा घेऊन निषेध केला जाणार आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

 

यंदाच्या वर्षी कापूस पिकात बोंड आळीचा प्रादुर्भाव होणार, हे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अहवालात नमूद केले होते. या संदर्भात मी स्वतः राज्यातील संबंधित मंत्र्यांना पत्र लिहून याबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली होती. मात्र सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे यंदाच्या कापूस पिकाच्या नुकसानीला सरकार जबाबदार आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.