जिल्हा हागणदारी मुक्त करुन जनतेला चांगले आरोग्य देण्याचे स्वप्न पुर्ण करु या ! – पालकमंत्री आत्राम

0
714
Google search engine
Google search engine

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

गडचिरोली-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य 2018 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे. त्याच धर्तीवर संपुर्ण गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा आवाहन आज राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी केले. तसेच जिल्हा हागणदारी मुक्त करुन जनतेला चांगले आरोग्य देण्याचे स्वप्न पुर्ण करुन या असा संकल्प आज कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करण्याकरीता पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा सांस्कृतिक भवनात आयोजित केली होती. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, उपाध्यक्ष अजय कंकडालवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावळेकर, पठारे, युनिसेफचे जयंत देशपांडे , प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, भारतीय संस्कृती मध्ये महिलांना महत्वाचे स्थान आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या समोर आदराने डोक्यावर पदर घेतात. ही आपली संस्कृती आहे. जगामध्ये भारतीय संस्कृती ही आदर्श म्हणून मानल्या जाते. महिलांना ऐवढे महत्व असताना आपली माता, भगिनी लोटा घेऊन शौचास बाहेर जाते. ही बाब आपल्या संस्कृतीस शोभणारी नाही. आपल्या आया बहीणीची लज्जा राखणे तसेच उघडयावर शौचास जाण्यामुळे होणारी कुचंबणा थांबवणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी महत्वाचा भाग म्हणजे घरातील महिला, वडीलधारी मंडळी व लहान मुले यांच्यासाठी शौचालय असणे व त्याचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. याकरीता आपल्याला घराघरात शौचालय बांधकाम करणे आवश्यक झाले आहे. जेणे करुन सर्वांना याचा वापर करता येईल.
—-२—-
गडचिरोली जिल्हयात प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुध्दा वडसा, कोरची, मुलचेरा ही तीन तालुके हागणदारी मुक्त झाली आहेत. याबध्दल तेथील जनतेचे, प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री यांनी अभिनंदन केले. त्याच प्रमाणे डिसेंबर अखेरपर्यंत भामराग, आरमोरी, गडचिरोली, कुरखेडा व धानोरा ही तालुके हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन आहे. उर्वरीत तालुके हागणदारी मुक्त करुन मार्च 2018 अखेरपर्यंत गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हयातील 456 ग्रामपंचायत पैकी 227 ग्रामपंचायती आज पर्यंत शासनानी हागणदारी मुक्त घोषीत झालेल्या आहेत. 229 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त होणे बाकी असून त्यामध्ये 44 हजार 256 लाभार्थ्यांचे वैयक्तिक शौचालय बांधकाम करायचे आहे. जे शौचालय आहे त्याचा वापर नागरिकांनी , घरातल्या सर्व सदस्यानी नियमित करावा व गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे पण सहकार्य लाभणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी शाळेतील मुलांना स्वच्छतेच्या सवयीमध्ये सातत्य राहावे व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरापर्यंत स्वच्छतेच्या सवयी रुजाव्या याकरीता शाळेमध्ये व परिसरात जनजागृतीकरीता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाळा स्टीकर्स/ ब्रोरशरचे अनावरण पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, युनिसेफचे समन्वयक जयंत देशपांडे यांनी समयोचित भाषण करुन कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला जिल्हयातील सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी / कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन योगेश फुसे यांनी केले.