७ ते १० डिसेंबर पर्यंत वरुडात कृषी विकास परिषद -२०१७, मुख्यमंत्र्यांनी दिल्यात कार्यक्रमाला शुभेच्छ्या.

0
712

वरुड : तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावांमध्ये विविध प्रकल्प उभे करावेत या उद्देशाने कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने कृषीमित्र इव्हेंन्टस व मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकारातून वरुड येथे कृषी विकास परिषद -२०१७ दि. ७ ते १० डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांना आ.डॉ.अनिल बोंडे यांनी दिले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरुड येथे आयोजित कृषि विकास परिषद महोत्सवाच्या कार्यक्रमाला शुभेच्छ्या दिल्या आहेत. ४ दिवस चालणाऱ्या कृषि विकास परिषदेत राज्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठा सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कृषी विकास परिषद महोत्सव २०१७ विषयी जगाच्या पाठीवर भारत हा विविधतेने नटलेला एकमेव देश आहे. भारताच्या विविध प्रांतात असलेली आगळी-वेगळी संस्कृती, सणउत्सव, पेहराव, खाद्य संस्कृती, कृषीची विविध उत्पादने आदी सर्व विविधतेने नटलेली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती होय, भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी विदर्भप्रांतातील व राज्यातील संशोधक येतात अशा विविधतेने नटलेल्या भारतीय यंदाच्या कृषी विकास परिषद महोत्सवात राज्यातील संस्कृतीचे प्रदर्शन देखील या राष्ट्रीय कृषी विकास परिषद महोत्सवात पाहण्यास मिळेल. कृषी प्रदर्शन, भारत व कृषी संस्कृती प्रदर्शन, बारा बलुतेदारांचे स्वयंपूर्ण गाव, कृषि प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल असते. राज्यासह विदर्भातील शेतकरी, कृषी तज्ञ, पर्यावरण तज्ञ, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कृषी अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, शेती व बिगरशेती व्यावसायिक, गृहिणी यांचा लाखोंच्या संख्येने कृषी विकास परिषद महोत्सवात सहभाग नोंदविला जाणार आहे.

कृषी विकास परिषद महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले यांच्या हस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी व १८ महिन्यात ११ पिके घेऊन विक्रमी उत्पन्न घेणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सदन शेतकरी श्री.शंकरराव खोत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच प्रमुख अथिती म्हणून मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधाताई बोंडे, वरुडच्या नगराध्यक्षा स्वातीताई आंडे, मोर्शीच्या नगराध्यक्षा शीलाताई रोडे व शेंदूरजना घाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे यांची उपस्थिती राहणार आहे. तर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सुवर्ण कोकण विशेष कार्यशाळा आयोजित केली असून यामधून हमखास नफ्याची शेती व कृषी उद्योगातील श्रीमंतीचे रहस्य, शेतजमीन माती परीक्षणाचे महत्व, शेतीपूरक व्यवसायातील श्रीमंती, वातावरणातील बदलाचा शेतीवरील परिणाम, शेळीपालन, कुक्कुट पालन, मत्स्य शेती, पशुपालन व दुग्ध व्यवसाय, मशरूम लागवड, हमखास नफ्याची शेती या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित केली असून या कार्यशाळेला सुवर्ण कोकण गौरव महाराष्ट्राने सन्मानित सतीश परब यांचे शेतकऱ्यांना मौलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये वयोगट १४ वर्ष व त्यावरील युवक-युवतींची समूह नृत्य स्पर्धा पार पडणार आहे.

शुक्रवार दि. ८ डिसेंबर २०१७ रोजी १० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री मा.ना.श्री.पांडुरंगजी फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणनचे राजमंत्री मा.ना.श्री.सदाभाऊ खोत तर प्रमुख अथिती म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग, पर्यावरण, व खनिकर्मचे राज्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. प्रवीण पोटे पाटील, वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री.रामदासजी तडस तर प्रमुख अथिती म्हणून आ.डॉ.अनिल बोंडे, आ.डॉ.सुनीलजी देशमुख, आ. वीरेंद्रजी जगताप, आ.रमेशजी बुंदिले, आ.रविजी राणा, आ.प्रभूदासजी भिलावेकर, आ.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, आ.यशोमतीताई ठाकूर, आ.डॉ.श्रीकांतजी देशपांडे यांची उपस्थिती राहणार आहे. व सकाळी ११ वाजता पशुपालन व दुग्धव्यवसाय कार्यशालेळा मुख्य मार्गदर्शक म्हणून नागपूर व अमरावती विभागाचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मा.हेमंतजी गढवे, तर झिरो बजट नैसर्गिक शेती कार्यशाळेला झिरो बजट शेतीचे तज्ञ पदमश्री मा.सुभाषजी पाळेकर यांचे मागर्दर्शन लाभणार आहेत, त्यासोबतच सायंकाळी ५ वाजता प्रसिध्द वऱ्हाडी लोककला “दंडार” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. ९ डिसेंबर २०१७ रोजी १० वाजता राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व मस्त्य व्यवसाय मंत्री हे स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन अमरावतीचे विभागीय आयुक्त श्री.पियुषजी सिंग यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आयएएस मिशनचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्रजी काठोळे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.दिनेशजी सूर्यवंशी, स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शक श्री.शिवाजी कुचे उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी १२ वाजता संत्रा लागवड, व्यवस्थापन व निर्यात या विषयावर निंबूवर्गीय फळ अनुसंधान केंद्र नागपूरचे डॉ.एम.एस.लदानिया, डॉ.पि.एस शिरगुडे, डॉ.ए.के.दास, डॉ.आय.पी.सिंग, ए.दि.हुच्चे, डॉ.श्रीवास्तव, डॉ.सि.एन.राव, डॉ.दिनेश कुमार हे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुपारी २.३० वाजता संत्रा प्रक्रिया कार्यशाळेला वरिष्ठ शास्त्रज्ञ व जैन इरिगेशन सिस्टीम जळगांवचे प्रतिनिधी डॉ.अनिलजी ढोके हे मार्गदर्शन करणार आहेत. रेशीम शेती उत्कृष्ट जोडधंदा या विषयावर अमरावती रेशीमउद्योगचे सहायक संचालक मा.महेंद्रजी ढवळे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुपारी ३.३० वाजता मोबाईल द्वारे शेतमाल विक्री व महिलांचा शेतीमध्ये सहभाग या विषयावर एमगिरी वर्धाचे संचालक डॉ.काळे व उपसंचालीका प्रगती गोखले हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता ग्रामविकास सप्तखंजेरी प्रबोधनकार श्री.सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

रविवार दि. १० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी १० वाजता राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. सुभाषजी देशमुख, गृह शहरे तथा नगरविकास राज्यमंत्री मा.ना.श्री.डॉ.रणजीतजी पाटील यांच्या उपस्थित कार्याक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याकार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.श्री.अशोक उईके हे उपस्थित राहणार आहेत. उदघाटन सोहळ्याच्या नंतर जलयुक्त शिवार व पावसाच्या पाण्याचे संवर्धन विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेला एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समितीचे तज्ञ सदस्य मा.माधवराव कोठस्थाने मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी ११ वाजता सुष्म सिंचनवर जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मा.डॉ.बाळकृष्ण जडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर सकाळी ११.३० वाजता डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील माजी कुलगुरू मा.डॉ.शरदजी निंबाळकर हे कपाशी व बोंडअळी तसेच किटकनाशकांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर दुपारी १२.३० वाजता बांबू लागवड व त्याचे शेतक-यांना होणारे आर्थिक फायदे या विषयाच्या कार्याक्रमाध्यक्ष म्हणून अमरावतीचे उप वनसंरक्षण मा.हेमंतजी मीना तर अमरावती बांबू गार्डन व वनविभागाचे वनपाल श्री.सय्यद सलीम अहमद यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच दुपारी १ वाजता शेतमालाच्या भावाचे गणित याविषयावर माजी आमदार पाशाजी पटेल यांची उपस्थिती राहणार असून ते सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून मध्यप्रदेशाचे आमदार श्री.चंद्रशेखर देशमुख व अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे उपस्थित राहणार आहेत. व दुपारी १.३० वाजता शेतकरी गट व कंपनी व्यवस्थापनाबाबत पुणे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक मा.योगेश थोरात हे उपस्थितीतांना मार्गदर्शन करणार आहे. या समारोपीय कार्यक्रमामधून चार चालणाऱ्या कृषि विकास परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध मान्यवरांचा सन्मान होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामधून उत्कृष्ट शेतकरी बांधवांचा सत्कार होणार असून त्यासोबतच विविध पुरस्काराचे वितरण सुद्धा केल्या जाणार असल्याची माहिती मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकातून दिली आहे.