खड्डेमुक्त रस्ते अभियान यशस्वी – श्री चंद्रकांत पाटील

0
745
Google search engine
Google search engine

राज्यातील 17 जिल्ह्यातील रस्त्यांवर संपूर्ण खड्डेमुक्ती
प्रमुख जिल्हा मार्गावरील 82.84 टक्के खड्डे बुजविले
खड्ड्यांची माहिती कळविल्यास तातडीने खड्डे भरणार

 

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजविणात येणार असल्याचे सांगितले होते. यासाठी मंत्रालयात वॉररुमही सुरू केली होती. या मोहिमेला यश आले असून प्रमुख राज्य मार्ग व राज्य मार्गावरील 97.25 टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गावरील 82.84 टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित कामे वेगाने सुरू असून लवकर सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. काही मार्गावर जर खड्डे आढळले तर नागरिकांनी कळवावे, ते खड्डे तातडीने बुजविण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी खड्डेमुक्त रस्ते अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील रस्त्यांची कामे ही वाहतुकीचा अंदाज न घेता, क्षमता न पाहता करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात राज्य मार्गावरील रस्त्यांवर खड्डे पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एकूण 89 हजार 190 किमी लांबीचे रस्ते असून त्यामध्ये 6 हजार 163 किमीचे प्रमुख राज्य मार्ग, 30 हजार 970 किमीचे राज्य मार्ग आणि 52 हजार 057 किमीचे लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. आज 15 डिसेंबर 2017 च्या दुपारपर्यंत यातील प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे पडलेल्या 23  हजार 381 किमी लांबीच्या रस्त्यांपैकी 22 हजार 736 किमी (97.25 टक्के) लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर उर्वरित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. राज्यातील 17 जिल्ह्यातील खड्डे शंभर टक्के बुजविण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी टिकाऊ डांबरीकरण आणि रोड कोटिंग करण्यात आले. काही तुरळक ठिकाणी तांत्रिक अडचणी, अवकाळी पाऊस अशा कारणांस्तव खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण झाली नसली तरीही कामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहेत. प्रमुख जिल्हा मार्गाचे रस्ते हे जिल्हा परिषदांकडून बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले आहेत. यातील 52 हजार 54 किमी लांबीच्या रस्त्यांपैकी 32 हजार 588 किमी लांबीच्या रस्त्यांवर खड्डे पडले होते. यातील 26 हजार 994 किमी लांबीच्या (82.84 टक्के) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदांकडून वर्ग झालेले रस्ते हे रोहयोअंतर्गत तयार केलेले असल्यामुळे तसेच त्यांची अवस्था खूपच खराब असल्यामुळे या रस्त्यांची कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पाटील म्हणाले की, राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे पूर्ण करण्यासाठी स्वतः 30 जिल्ह्यांमध्ये मोटारीतून रस्तेमार्गावरून दौरा केला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील अभियंत्यांची बैठक घेतली आहे. तसेच खड्डे बुजविण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी व या कामाची प्रगती रियलटाईम कळण्यासाठी मंत्रालयात वॉररुम तयार केली आहे. प्रत्येक कामाची माहिती ऑनलाईन साईटवर टाकण्यात येत होती. खड्डे असलेले रस्ते, ते बुजविण्यात आल्यानंतरचे खड्डे आदींची माहिती फोटोसह या ठिकाणी मिळत होती. त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे काम वेगाने करता आले. राज्यात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत सुरू असून या मार्गावरील खड्डेही लवकरच पूर्णपणे भरण्यात येणार आहेत. ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गावरील कामेही ग्राम विकास विभागामार्फत करण्यात येत असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ही कामे होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची दर्जेदार कामे व्हावीत, यासाठी प्रथमच 10 कि.मी. लांबीचे रस्ते वार्षिक देखभाल दुरुस्तीसह तयार करण्यासाठी कंत्राट देण्यात येत आहेत. यानुसार या मार्गावरील खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात आली असून त्याची वार्षिक देखभाल दुरुस्ती ही कंत्राटदार करणार आहेत. राज्यातील रस्त्यांचा दर्जा कायमस्वरूपी उंचावण्यात येणार आहे, त्यामुळे हे अभियान इथेच संपत नसून राज्यातील जनतेला कायमस्वरूपी दर्जेदार आणि सुरक्षित रस्ते देण्यासाठी  सार्वजनिक बांधकाम विभाग लवकरच मोठ्या प्रमाणावर रस्ते नुतनीकरण व सुदृढीकरणाचा कार्यक्रम सुरु करणार आहे. तसेच नव्या वर्षात राज्यात ‘उत्कर्ष महामार्ग’ उपक्रम सुरु होत आहे. ज्यामध्ये हायब्रीड ॲन्युईटी मॉडेलच्या सुधारित तत्त्वावर राज्यभरात सुमारे दहा हजार किलोमीटरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.