वादग्रस्त जादूटोणा कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर आंदोलन- महाराष्ट्र अंनिसचे विश्‍वस्त मंडळ बरखास्त करून ट्रस्टवर प्रशासक नियुक्त करा

0
474
Google search engine
Google search engine

नागपूर येथे वारकरी संप्रदाय व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची धरणे आंदोलनाद्वारे शासनाला चेतावणी !

*नागपूर* – तत्कालीन काँग्रेस शासनाने जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष शाम मानव, सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बागवे,छाया सावरकर आदी वादग्रस्त आहेत. त्यांच्या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेस शासनाने नेमलेली ही समिती विद्यमान भाजप-शिवसेना शासनाने त्वरित विसर्जित करावी. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिसने) अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यांच्या विरोधात कार्य करत असल्याचा दावा करत देश-विदेशांतून विविध प्रकारे कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला; मात्र त्याचा हिशेब न देता ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे केले आहेत. ते साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा यांच्या चौकशी अहवालातूनही उघड झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंनिस ट्रस्टचे विश्‍वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात यावा, या मागण्यांसाठी आज नागपूर येथील पटवर्धन मैदानात वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात राष्ट्रीय वारकरी सेना, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी हातात हस्तफलक घेऊन ‘वारकर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावणारी जादूटोणा कायद्याची शासकीय समिती विसर्जित करा !’, ‘सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून नास्तिकतावादाचे विचार पसरवणारी शासकीय समिती विसर्जित करा’, ‘शासन आणि जनतेची फसवणूक करणारी महाराष्ट्र अंनिस विसर्जित करा!’, ‘अंनिस म्हणते नका देवाला वंदू आणि स्वतः बनली सामाजिक भोंदू, सामाजिक भोंदू !’, अशा उर्त्स्फूतपणे घोषणा या वेळी देण्यात आल्या.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर म्हणाले की,नागपूरमध्ये आज शासनाच्या विरोधातील अंनिसवाल्यांचे ‘जवाब दो आंदोलन’ म्हणजे दांभिकतेचा उत्कृष्ट नमुना आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ट्रस्टमधील अनेक घोटाळे पुराव्यानिशी उघड झालेले आहेत. ट्रस्टमधील घोटाळ्यांची व्याप्ती उघड व्हावी म्हणून ट्रस्टचे ‘विशेष लेखा परिक्षण’ करण्याची शिफारस सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी शासनाकडे केली आहे. नुकतेच केंद्रीय गृहखात्याने त्यांच्यावर विदेशी निधी घेण्यावर बंदी घालणारी नोटीसही बजावली आहे. त्यामुळे इतरांकडून जवाब न मागता अंनिसनेच आता महाराष्ट्रातील जनतेला घोटाळ्यांबाबत जवाब द्यावा !

राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प.बापू महाराज रावकर म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असतांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात समितीचे सहअध्यक्ष शाम मानव यांनी

‘संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे धादांत खोटे आहे’, असे विधान केले.

अशा प्रकारची विधाने करून ते कोणत्या कायद्याचा प्रचार करत आहेत ? हा कायद्याचा प्रचार नसून वारकर्‍यांच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा अघोरी अन् अनिष्ट प्रकार आहे. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून सरकारी खर्चाने नास्तिकतेचे विचार जनतेच्या माथी लादण्याचे काम सदर शासकीय समिती करत आहे. त्यामुळे ती समिती तात्काळ विसर्जित झाली पाहिजे.