शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी संशोधन होणे गरजेचे – राज्यपाल सी. विद्यासागर राव

0
1103
Google search engine
Google search engine

वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण

यवतमाळ- : भारत हा कृषीप्रधान देश आहे. पाच वर्षात शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाच्या पतंप्रधानांनी “पर ड्रॉप मोर क्रॉप” चा नारा दिला आहे. या गोष्टी साध्य करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून संशोधन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठांतर्गत वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नुतन वास्तुचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, सफाई कर्मचारी संघटनेचे रामोजी पवार, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले उपस्थित होते.

विदर्भातील हे पहिले शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आहे, असे सांगून राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी भरीव काम केले आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांचे नाव सदैव आठवणीत ठेवले जाते. गत काही वर्षापासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. बदलत्या हवामानाचा खूप मोठा परिणाम कृषी, अन्नधान्य आणि ग्रामीण जीवनावर पडला आहे. या बदलत्या हवामानाचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही राज्य आणि केंद्र सरकारची पहिली

प्राथमिकता आहे.

कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये होणा-या संशोधनाचा लाभ जोपर्यंत शेतकरी आणि कृषी क्षेत्राला होत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रातील पदवी आणि संशोधनाला महत्व नाही. शेतकऱ्यांसमोर असलेले प्रश्न समोर ठेवून आपले शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाने संशोधनाचे प्राधान्यक्रम ठरवायला पाहिजे. शेतक-यांचे प्राधान्य आणि आपल्या कृषी संस्था किंवा विद्यापीठातून होणाऱ्या संशोधनात तफावत नसावी. यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य किंवा मार्गदर्शन घेऊन एक पथक तयार व्हायला पाहिजे. शेवटी शेतक-यांचे आर्थिक स्थैय उंचवावे, हे आपले उद्दिष्ट आहे.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञानामध्ये शिक्षण घेण्याची विद्यार्थी आणि संशोधकांना एक चांगली संधी आहे. केवळ पारंपारिक शेती किंवा उपाययोजना करून चालणार नाही. तर त्यासाठी जैवतंत्रज्ञान आणि सुक्ष्म तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. आपल्या कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांना दिलासा देणारे संशोधन होईल. तसेच बियाणे आणि खते शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून दिले जाईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विदर्भात कीड आणि किटकनाशकाचा विषय सुरू आहे. किटकनाशकाच्या फवारणीत काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे. या बाबत शासन अतिशय गंभीर आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये, यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरू करावा. तसेच येथे मागणीप्रमाणे कृषी महाविद्यालयसुध्दा साकारण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून संशोधन, विस्तार आणि नवनवीन संकल्पना साकारणारे राज्यातील एक तरी कृषी विद्यापीठ जागतिक नामांकनांत यायला पाहिजे. महाराष्ट्र हे फलोत्पादनात अग्रणी असलेले राज्य आहे. आंबे, द्राक्षे, केळी, डाळींब आणि नागपूरी संत्री यांच्या निर्यातीत आपला प्रथम क्रमांक आहे. या फळांवर प्रक्रीया करणारे उद्योग असले की त्यातून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांनी सामूहिक शेती करावी. तसेच जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, जैवकिटकनाशक आदी पुरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांमध्ये नियमित संवाद व्हावा. तसेच राज्य सरकार, कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यात नियमित संवाद राहिला की कृषी क्षेत्राचे निश्चित ध्येय आपण गाठू शकतो, असे ते म्हणाले.
याप्रसंगी पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे भुमिपूजन आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाली. राज्य शासनाने या महाविद्यालयासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यवतमाळ हा कापसाची ओळख असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात 9 लक्ष 15 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. शेतक-यांच्या जीवनात आमुलाग्र बदल करण्यासाठी तसेच त्यांना समाजात ताठ मानेने उभे राहण्यासाठी या महाविद्यालयाचे महत्व आहे. शेतक-यांच्या मुलांना अतिरिक्त 12 टक्के गुण देऊन येथे प्रवेश देण्यात येता. या महाविद्यालयामुळे प्रत्यक्ष बांधावर फायदा होईल, असे ते म्हणाले.
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, यवतमाळचे वैभव वाढविणारी ही वास्तु आहे. अतिशय वेगाने या महाविद्यालयाचे काम झाले असून अत्याधुनिक शेतीशास्त्र शेतक-यांपर्यंत पोहचविण्यात या महाविद्यालयाची भुमिका महत्वाची राहणार आहे. शेतीला कौशल्याची जोड मिळाल्याशिवाय शाश्वत विकास होऊ शकत नाही. या महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतक-यांच्या शंकांचे निरसन होईल तसेच त्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी राज्यपाल यांच्या हस्ते फित कापून महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसंतराव नाईक आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भेले यांनी केले. संचालन डॉ. प्रदीप बोरकर यांनी तर आभार डॉ. आर.एम. गाडे यांनी मानले. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छगन वाकडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खडसे, विस्तार शिक्षण संचालक डी.एम. मानकर, कुलसचिव डॉ. पी.आर. कडू, अधिष्ठाता डॉ. एम.बी.नागदेवे यांच्यासह शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००००