आज स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा – तेरवीच्या कार्यक्रमऐवजी गोरगरीब जनतेसाठी आजपासून रुग्णवाहिका होणार उपलब्ध

0
711
Google search engine
Google search engine

ढोले परिवाराचा असाही स्तुत्य उपक्रम 

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान) 
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे नाव समाजात मोठे व्हावे यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो आणि यासाठी वाटेल ते ते करायला तयार असतात. परंतु ह्या विपरीत सुद्धा काही व्यक्ती असतात की ज्यांनी आयुष्यभर गोरगरिबांची सेवा केली आणि मरणानंतरही त्यांची सेवा सतत समाजाला प्रेरणादायी रहावी यासाठी प्रयत्न करणारे सुद्धा समाजात व्यक्ती आहेत.
    माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांनी तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या छोट्याशा गावातून चांदूर रेल्वे शहरात येऊन वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमाने गोरगरिबांची सेवा करता करता कालांतराने राजकीय प्रवाहात उडी घेतली. सुरूवातीला काँग्रेस चा धुरा सांभाळत व त्यानंतर जनता दल सेक्युलर तर्फे आमदार म्हणून स्वर्गीय डॉ. पांडुरंग ढोले यांनी 1994 ते 1999 पर्यंत व नंतर आपली कारकीर्द सर्वसामान्य जनता गोरगरीब शेतकरी शेतमजुरांसाठी वाहून घेऊन सतत त्यांच्या सेवेचा ध्यास घेतला. त्यांनी रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. तालुक्यातील विद्यार्थ्यांना आजही ओबीसी स्कॉलरशिप मिळत आहे ती स्व. डॉ. पांडुरंग ढोलेंचीच देण आहे. तसेच चांदूर रेल्वे शहरात जी ‘विदर्भ एक्सप्रेस’ थांबते तीसुद्धा स्व. डॉ. ढोलेंच्याच अथक परीश्रमाने. माणूस किती जगला त्याला महत्व नसते, परंतु माणूस कसा जगला त्याला महत्त्व असते. यामुळे ती व्यक्ती मरत नाही तर अमर राहते.       स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांचे जरी अपघातात निधन झाले तरी आजही सर्वसामान्यांच्या जीवनात ते जिवंत असल्याचे दिसते. कारण त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी श्रीमती अलकाताई ढोले, सुपुत्र डॉ. क्रांतीसागर ढोले यांनी त्यांची तेरवी वगैरे न करता त्यांची समाजातील सेवा अखंड राहावी म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वसामान्य, गरीब होतकरू जनतेसाठी रुग्णवाहिका आज सोमवार पासुन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे नाव आजही शहरात सर्वसामान्य जनता घेत असून त्यांना धन्यवाद देत आहे. आज सोमवारी या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा स्थानिक संताबाई यादव मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. यासाठी शेवटी म्हणावेसे वाटते की ‘मरावे परी कीर्ति रूपे उरावे’ ही म्हण माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांच्यासाठी तंतोतंत खरी ठरत आहे.