डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे अभिवादन कार्यक्रम

0
1120
Google search engine
Google search engine

रोजगारक्षम शिक्षणातून समाजाचा विकास:- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे

अमरावती :-

स्थानिक परिसरातील विकासप्रक्रियेशी अभ्यासक्रम जोडून रोजगारक्षम शिक्षणावर राज्य शासनाकडून भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण व रोजगारक्षम शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 119 व्या जयंती निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार अशोक उईके, जि. प. बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, माजी अध्यक्ष अरूण शेळके आदी उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले की, भाऊसाहेबांनी शिक्षण प्रसारासह शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठीही प्रयत्न केले. शासनाकडून शिक्षणात काळानुरुप बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या भागातील विकासप्रक्रियेत येथील मनुष्यबळ सामावून घेण्यासाठी त्यांच्यात कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम शैक्षणिक संस्थांनी सुरु केले पाहिजेत. शासनाकडून अशा रोजगारक्षम शिक्षणावर भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण व रोजगारक्षम शिक्षणातून बहुजन समाजाचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे कार्य मोठे असून, संस्थेने स्वायत्त विद्यापीठाची मान्यता घेतल्यास त्यांना स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अभ्यासक्रम सुरु करता येतील. त्यासाठी शासनाकडून संस्थेला संपूर्ण साह्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

श्री. पोटे-पाटील म्हणाले की, भाऊसाहेबांनी मोठ्या त्यागातून संस्थेची उभारणी व विस्तार केला. बहुजनांसाठी ज्ञानगंगा आणली. भारत कृषक समाजाच्या माध्यमातून शेतक-यांसाठी मोठे कार्य केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जगभरात विविध पदे मिळवून उज्ज्वल कामगिरी केली आहे व करत आहेत.

हे भाऊसाहेबांचे मोठे योगदान आहे.दहावी अनुत्तीर्णांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना तत्काळ पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आली. त्याचा लाभ ३५ हजार विद्यार्थ्यांना झाला. असे अनेक नवे निर्णय शिक्षण क्षेत्रात लोकाभिमुख बदल घडवत आहेत, असेही ते म्हणाले.

श्री. देशमुख म्हणाले की, भाऊसाहेबांनी त्याग, कष्ट व तळमळीतून बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविले. त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधीलकीतून संस्था वाटचाल करत आहे.

संस्थेतर्फे डिजिटलायझेशन आदी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

वीर उत्तमराव मोहिते यांनी लिहिलेल्या भाऊसाहेबांच्या चरित्राचा इंग्रजी अनुवाद, भाऊसाहेबांच्या विविध भाषणांचा संग्रह, तसेच संस्थेच्या दैनंदिनीचे प्रकाशन यावेळी झाले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांनी आभार मानले.