भीमा कोरेगाव प्रकरण निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांची उद्या बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक.

0
942
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांव, वढू बु. आणि शिक्रापूर सह चार गावात अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करत दंगल घडविली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेत पाळावा असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे.

आंबेडकर म्हणाले की, भीमा कोरेगाव घटनेचे राज्यभरात उमटत असलेल्या हिंसक पडसादावर सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी. बंदच्या काळात सर्वसामान्यांना त्रास होईल असे काही करु नका असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषदेसाठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. त्यादिवशी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना फोन करत होतो, पण त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज येत होता. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आणि पोलिसांची कुमक घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. हलगर्जी पणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली आहे. कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचे अनुदान सरकारने बंद करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि स्थानिक नेते घुगे हे या घटनेचे सूत्रधार आहेत. त्यांनी हे सगळे कटकारस्थान रचले असल्याच्या दावा त्यांनी केला.