अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता दुरुस्ती कामाचा महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांच्या हस्ते शुभारंभ !

0
683
Google search engine
Google search engine

 

अहमदनगर / ऊमेर सय्यद – 

 

– बाहेरील जिल्ह्यातून शहराकडे येणाऱ्या तसेच जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीसाठी सर्वाधीक महत्वाच्या असलेल्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आज राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. या रस्ता दुरुस्तीमुळे वाहतुकीची कोंडी होणार नसल्याने हे काम तात्काळ करण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.

यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, राज्य होमिओपॅथिक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, प्रा. भानुदास गरड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. भोसले, कार्यकारी अभियंता श्री. विभुते, उपविभागीय अधिकारी उज्जवला गाडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर शहरातील अवजड वाहतूक शहराबाहेरुन जाण्यासाठी उपयुक्त असणारा हा बाह्यवळण रस्ता खराब झाल्याने दुरुस्तीची मागणी होत होती. त्यामुळे या मागणीची दखल घेत या दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला.

दरम्यान, सकाळी महसूलमंत्री श्री. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद रस्त्यालगत असणाऱ्या पर्यावरणपूरक मुख्य विभागीय इमारत परिसरास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हरित इमारत संकल्पनेवर आधारित या इमारतीची रचना, बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्थांबाबत संबंधितांचे कौतुक केले.

त्यानंतर श्री. पाटील यांनी पालकमंत्री प्रा. शिंदे व इतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीची पाहणी केली. हे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.