अवैध गौण खनिज कारवाईत तहसिलदार, ना. तहसिलदारांची असहकार्याची भुमिका – जीव धोक्यात टाकून तलाठी,मंडळ अधिकारी करतात अवैध गौण खनिज कारवाई

0
684
Google search engine
Google search engine

गौणखनिज वाहतुक तपासणीवर टाकला बहिष्कार

चांदूर रेल्वे- (शहेजाद खान  )

तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुक धडाक्यात सुरू असतांना या वाहतुकीवर अंकुश मिळविण्यासाठी नेमलेल्या पथकाला महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकाला सहकार्य मिळत नसल्याचा खळबळजनक आरोप एका तलाठ्याने काहि महिन्यांपुर्वी केला होता व याबाबत एक पत्र नायब तहसिलदारांना लिहुन ते वॉट्सअॅप व्दारे पाठवुन तिव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र यानंतर सुध्दा प्रशासनात बदल झालेले दिसत नाही. कारण ४ फेब्रुवारीच्या वार्षिक आमसभेमध्ये अवैध गौण खनिज कारवाईत तहसिलदार राजगडकर, नायब तहसिलदार राठोड यांचेकडुन मंडळ अधिकारी, तलाठी यांना असहकार्याची भुमिका मिळत असल्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुक तपासणीवर मंडळ अधिकारी, तलाठी यांनी बहिष्कार टाकला आहे.
तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर लगाम बसविण्यासाठी महसुल विभागाकडुन सोनगाव रोडवरील चौफुलीजवळ एक चेकपोस्ट तयार करण्यात आली आहे. या चेकपोस्टवर शुक्रवारी मंडळ अधिकारी लंगडे, पटवारी गाठे, पुसदकर, लांजेवार, ठवकर व दोन कोतवाल हजर होते. यावेळी सकाळी ७ वाजता ३ ट्रकांमध्ये अतिभार रेती आढळुन आली. त्यामुळे त्यामधील १ ट्रक विनंतीवरून तहसिल कार्यालयात लावला. व उर्वरीत २ ट्रक पसार झाले. या तीनही ट्रकचे पंचनामे मंडळ अधिकारी लंगडे यांनी करून तहसिलमध्ये सादर केले. याचदरम्यान मंडळ अधिकारी यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना फोनवरून पोलीसांना पाठविण्याची विनंती केली. यावरून ठाणेदार स्वत: आले मात्र गाडीतुन खाली न उतरता निघुन गेले. मंडळ अधिकारी पुन्हा पोलीस स्टेशनला गेले व फोनवरून पुन्हा येण्याची विनंती केली. मात्र यावर ‘आम्ही तुमचे नौकर आहोत काय?’ अशा शब्दांत बेजबाबदपणाचे उत्तर देऊन नंतर आलेच नसल्याचे मंडळ अधिकारी यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी यांनी माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. मात्र तेव्हा २ ट्रक पसार झाले होते. यादरम्यान तलाठी, मंडळ अधिकारी यांना जिवे मारण्याच्या धमक्या, शिवीगाळ करण्यात आली. यानंतर तीनही ट्रकचे मालक ट्रकच्या बाबतीत बोलण्यासाठी तहसिदार यांच्याजवळ गेले. परंतु पसार झालेले ट्रक जमा करण्यासाठी तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी पोलीसांची मदत घेऊन कुठलेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेकवेळा मंडळ अधिकारी, तलाठी यांना अधिकाऱ्यांसमोरच धमक्या देत असल्याचेही समजते. तरीही सदर अधिकारी कधीही तलाठ्यांची बाजु घेतांना दिसले नाही.
तहसिलदार राजगडकर, नायब तहसिलदार राठोड यांची गौण खनिज कारवाईत सहकार्य मिळत नसल्यामुळे मंडळ अधिकारी, पटवारी संघटना चांदुर रेल्वेतर्फे गौण खनिज वाहतुक तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला असुन जोपर्यंत अधिकाऱ्यांचे सहकार्य, शासकीय वाहन, पोलीस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत गौण खनिजाच्या ड्युटीवर जाणार नसल्याचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन सांगितले आहे.