गारपिटग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी – शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

0
1063
Google search engine
Google search engine
गोंदिया-
जिल्ह्यातील काही भागात 13 फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 14 फेब्रुवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील काही गावांना भेटी देवून अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट प्रामुख्याने उपस्थित होते.
गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार, मोहाडी, कमरगाव यासह 40 गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास पाऊण ते एक फुटपर्यंत गाराचा खच शेतात, गावात साचला होता. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला दिल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, सर्वेक्षण करतांना महसूल, कृषि यंत्रणेने सरपंचासह अन्य लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून हे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.