सहकार खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे काजू उत्पादकांचे नाहक नुकसान ! – अधिवक्ता श्री वीरेंद्र इचलकरंजीकर

0
1365
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गातील सहकारी संस्थांतील भ्रष्टाचार; हिंदु जनजागृती समितीचा आंदोलनाचा इशारा

सह्याद्री काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित, खासकीलवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या केवळ 468 सभासदांच्या या संस्थेमध्ये सरकारची गुंतवणूक पाहिली, तर ती 3 कोटी 55 लाख 20 सहस्र इतकी प्रचंड आहे. या रकमेची परतफेड करण्यासाठी संस्थेकडून तारण म्हणून 160 गुंठे जमीन पडवे-माजगाव येथील घेतली आहे. या जमिनीचा सात-बारा पाहिला असता, त्यावर आधीच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, (शाखा-कोलझर) यांचेकडून एकूण 2 कोटी 45 लाखांचे कर्ज घेतल्यापोटी ती जमीन तारण असल्याची नोंद आहे. म्हणजेच तारण ठेवलेल्या जमिनीवरच पुन्हा कर्ज घेतलेले आहे. हा एक घोटाळाच आहे. शिवाय मार्च 2015 नुसार या जमिनीची किंमत साधारण 1 कोटी 60 लाख रूपयांच्या आसपास होती. म्हणजेच सर्व जमीन विकली, तरी शासनाच्या अडकलेल्या रकमेच्या निम्मी रक्कमही येणार नाही, अशी परिस्थिती आहे. शासनाचा म्हणजे एका अर्थाने जनतेचाच पैसा सहकाराच्या नावाखाली गुंतून पडला आहे. ज्या उद्देशाने कारखान्यात शासनाने इतक्या मोठ्या रकमा गुंतवल्या आहेत, तो उद्देश साध्य होत नाहीच. शासनाच्या कर्मचार्‍यांनी या कारखान्यांच्या कामकाजावर लक्ष देणे अपेक्षित असतांना सहकार खाते झोपा काढत आहे. या कारखान्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवून सहकार खात्याचे सहनिबंधक, उपनिबंधक, विशेष लेखापरीक्षक इत्यादींनी प्रतीमाह बैठक घेऊन कामकाजावर चर्चा करणे अपेक्षित होते, प्रतीमाह त्याचा अहवाल पाठवणे अपेक्षित होते. परंतु वर्ष 2012 पासून म्हणजेच आरंभीपासून आजपर्यंत असा एकही अहवाल बनवलेलाच नाही, अशी माहिती हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयात वकीली करणारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. संजय सामंत हेही उपस्थित होते.
जिल्ह्यात काजू उत्पादक मोठ्या प्रमाणात असतांना अशा पद्धतीने प्रकल्पांवर देखरेख न ठेवून शासनाचे आणि काजू उत्पादकांचे दुहेरी नुकसान करणार्‍यांवर शासनाने त्वरित कारवाई करावी; अन्यथा कारवाई होईपर्यंत आंदोलन छेडण्याची चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. संजय सामंत यांनी या वेळी दिली. राज्यकर्त्यांनी राज्यातील सर्व भागांमध्ये विकासासाठी समान प्रयत्न करणे त्यांचे कर्तव्य आहे, मात्र कोकणच्या बाबतीत असे होताना दिसून येत नाही. या प्रकरणी समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असून काजू उत्पादक किंवा या आंदोलनात सहभागी होणार्‍यांनी 9422435019 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समितीचे डॉ. संजय सामंत यांनी केले.