आजपासून तिर्थक्षेत्र सावंगा विठोब्यात भव्य गुढीपाडवा यात्रा – आज ७० फुट  उंच झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा भव्य दिव्य कार्यक्रम

0
1650
Google search engine
Google search engine

लाखोंची गर्दी उसळणार

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

अमरावती जिल्ह्यातील सातपुडाच्या इंद्राजी-चंद्राजी डोंगरात चिरोडीच्या घनदाट
जंगलात आलेल्या श्रीकृष्ण अवधुत महाराजांनी दोन गोट्टयावर ताल धरून अवधुती
भजनाच्या माध्यमातून जीवनाचं साधं सोपे तत्वज्ञान समाजाला सांगीतले. साडे तिनशे
वर्षापूर्वी अवधुत संप्रदाय स्थापुन अवधुत महाराजांनी समतेची ज्योत पेटवली.अशा
श्री संत कृष्णाजी अवधुत महाराजांची भव्य गुढीपाडव्या आजपासुन सुरू होत आहे.
गुढीपाडव्याला श्री अवधुत महाराजांच्या समाधी दर्शनासाठी देशभरातील लाखो
भाविकांची गर्दी सावंगा विठोबा येथे उसळणार आहे.

एक दहा-बारा वर्षाचा अनोळखी मुलगा चिरोडी गावात आला. उकंडराव चतुरांनी त्याला
सहारा दिला. गोविंद, संतु, चिंतु व पुनाजी या चार मुलांबरोबर गुरे-ढोरे चारण्याच्या
कामाला लावले. चारही मुले तत्कालीन सावंगा विठोबाच्या घनदाट जंगलात ढोरे चारत
असे. सध्याचे अवधुत मंदिराच्या गाभाऱ्याचा ठिकाणी भोश्याचे एक झाड होते. त्या
झाडाखाली अवधुत महाराज सुंदर भजन गात.त्यांना पुनाजीची साथ देत होती. अवधुत
महाराज सुंदर आवाजात भजन गात.सगळे मंत्रमुग्ध होत. अवधुत महाराजाच्या
गळ्यात जनु सरस्वतीचा वास होता. दोन गोट्यांवरील भजन सतत चालत राही अशी
परंपरेतून आलेली माहिती सावंगा विठोबा देवस्थानचे विश्वस्त दिनकर मानकर यांनी
सांगीतली.श्री अवधुत महाराजाची भजने पुनाजींना तोंडपाठ होती. श्री.अवधुत
महाराजांनी भजनातून समाजातील अनिष्ट जाती प्रथांवर प्रखर हल्ले चढविले. अत्यंत
सोप्या शब्दातून समाज प्रबोधन केले. त्यावेळी अवधुत मंदीराच्या ठिकाणी एक झोपडी
होती. साडेतीन दिवस कोणीही झोपडीचे दार उघडू नका असे सांगत अवधुत महाराज
झोपडीत शिरले. परंतु भक्तांना राहवलं नाही. दोन दिवसांनतर झोपडीचे दार उघडले
तर अवधुत महाराजांच्या शरीराचे पाणी झाले होते.त्या ठिकाणी समाधी बांधल्याचे
संस्थान अध्यक्ष गोविंद राठोड यांनी सांगीतले. तेव्हा पासून येथे कापूर जाळण्याची
प्रथा आहे. म्हणून सावंग्याची यात्रा कापूराची यात्रा म्हणून प्रसिध्द आहे. कापुरामूळे
वातावरण निजंतुक होते. सावंग्यात मनोरूग्णांना दिलासा मिळतो.म्हणून अनेक
मनोरूग्ण सावंग्यात उपचारासाठी येतात. विधीनुसार पुजा, पाच मुजरे व मंदिराला
प्रदक्षिणेमूळे अनेक मनोरूग्ण बरे झाल्याचे सचिव वामन रामटेके यांनी सांगीतले.

७० फुट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढविणार

मंदिरातील देव व भक्तांच्या ७० फुट उंच झेंड्यांना नविन खोळ चढविण्याचा भव्य
दिव्य कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी रवीवारी दूपारी ४ वाजता होणार आहे. अवधुत
महाराजाचे शिष्य पुनाजी महाराजांनी झेंड्याची प्रथा सुरू केली. तेव्हाचे लहान झेंड्यात
वाढ होऊन आज ७० फुट उंच झेंडे आहे. त्या ७० फुट उंच झेंड्यांना हभप चरणदास
कांडलकर पद स्पर्श न करता नवीन खोळ चढविणार आहे. हा क्षण पाहण्यासाठी
लाखोंची गर्दी उसळणार आहे. १८ ते २५ मार्च रामनववी पर्यंत मंदिरात दररोज दुपारी
२ ते ५ महाराजांच्या अवधुती भजनावर विचार मंथन कार्यक्रम आणि सायंकाळी ७
वाजता पालखी व रमना काढण्यात येणार आहेत. श्रीकृष्ण अवधुत महाराज मंदिर
व सभा मंडपाचे जिर्णोध्दारासाठी भाविकांनी तन मन धनाने सहकार्य करा असे आवाहन
श्री विठोबा संस्थानने केले आहे. या महोत्सवासाठी संस्थानचे अध्यक्ष गोविंद राठोड,
उपाध्यक्ष हरिदास सोनवाल, सचिव वामन रामटेके, विश्वस्त दिनकर मानकर, विनायक
पाटील, रूपसिंग राठोड, दत्तुजी रामटेके, अनिल बेलसरे, दिगांबर राठोड, पुंजाराम
नेमाडे, कृपासागर राऊत, स्वप्निल चौधरी, वसंतराव शेंडे, अनामत महाराज पाचघरे
सह स्वंयसेवक, गावकरी मंडळी झटत आहे.