आ. अमरसिंह पंडित यांच्यासह खाजगी पी. ए. विरोधात पुरवठा अधिकाऱ्याची तक्रार

0
761

बीड शहर:
दिपक गित्ते

आ. अमरसिंह पंडीत यांच्या खाजगी स्वीय सहाय्यकांनी मला माझ्या कार्यालयात येऊन धमकी व शिवीगाळ केली असल्याचा आरोप करत बीड जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांनी थेट शिवाजी नगर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली आहे. आ. पंडित यांच्या स्वीय सहाय्यकाने खंडणी मागितल्याचा देखील आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणात चौकशी करावी लागणार असल्याचे पोलिस अधिकाºयांनी सांगितले.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आ. पंडित यांचे खाजगी पी.ए. जालींदर राऊत, व सुभाष पाटील यांनी माझ्या कार्यालयात येऊन शिवीगाळ व धमक्या दिल्या आहेत. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील स्वस्त धान्य दुकान गेवराईला जोडून देण्याची कार्यवाही का होत नाही आ. पंडित यांनी सुचवलेले असतानाही का झाले नाही म्हणत शिवीगाळ केली असे तक्रारीत पुरवठा अधिकारी शेळके यांनी म्हटले आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्याच्या दबावाला घाबरणार नाही- आ. अमरसिंह पंडित
शेळके यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या तक्रारीला आणि दबावाला आपण घाबरणार नाही. जनसामान्यातील माझी प्रतिमा डागाळण्याचा हा कुटील डाव आहे, शेळकेंचा बोलविता धनी कोण?हे सामान्य जनतेला नक्की कळले असेल. या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करावी अशी मी मागणी करत आहे. असे सांगत ते पुढे म्हणाले की, शेळके यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक चौकशा सुरू आहेत. त्यांचे आजवरचे कर्तृत्व प्रशासनाला देखील माहिती आहे. अशी प्रतिक्रीया आ. अमरसिंह पंडित यांनी यावेळी दिली.