परळीत 80 दुचाकीस्वारांची चौकशी कागदपत्रांची केली पडताळणी; अनेकांना केला दंड!

0
703

परळीत 80 दुचाकीस्वारांची चौकशी

कागदपत्रांची केली पडताळणी; अनेकांना केला दंड!

बीड: परळी वैजनाथ

वाढत्या वाहन चोर्‍या आणि अवैध वाहनांचा वाढता वापर याला आळा घालण्यासाठी बीड पोलिसांच्या वतीने अशा वाहनधारकांवर कारवाईची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे दुचाकी वाहनांच्या चोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला असल्याचा दावा पोलिस करत आहेत. परळी शहरत आज शहर पोलिस ठाण्याच्या दारातच पोलिसांनी दुचाकी वाहनधारकांची तपासणी मोहीम हाती घेत तब्बल 77 वाहनांना पोलिस ठाण्यात लावले होते. 80 वाहनांवर कारवाई करण्याचे आज दिवसभराचे टार्गेट असल्याचेही कर्मचार्‍यांनी आमच्याशी चर्चा करतांना सांगितले.

आज (ता.22) रोजी परळी शहर पोलिस ठाण्यासमोर दुचाकी वाहनचालकांची धरपकड करण्यात आली. या पथकाचे प्रमुख वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक किशोर काळे आमच्याशी बोलतांना म्हणाले की, बीड जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम हाती घेतली असून, आज दिवसभरात तब्बल 80 दुचाकीस्वारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. वाहनांची कागदपत्रे, वाहनचालनाचा परवाना आदी गोष्टी तपासण्यात येत असून, ही कागदपत्रे न आढळल्यास मोटारवाहन कायद्याचे कलम 130, 177 नुसार त्यांना दंडही करण्यात आला. आज कारवाईसाठी परळीत दाखल झालेल्या पथकात पो.नि.किशोर काळे यांच्यासह पो.कॉ.नागरगोजे, चौधरी यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांचा सहभाग होता. तपासणीसाठी ताब्यात घेतलेल्या वाहनांची चौकशी करण्यात आली. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ज्यांच्याकडे समाधानकारक कागदपत्रे आढळली त्यांना सोडून देण्यात आले. तर ज्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती त्यांची वाहने अधिकच्या चौकशीसाठी परळी शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आली आहेत.

काहींना नाहक त्रास!

बीड पोलिस दलाच्या वाहतूूक शाखेने आज परळीत दुचाकीस्वारांची चौकशी मोहीम हाती घेतली. यामुळे वाहनचोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसत असलल्याचा दावा पोलिस करत आहेत. मात्र आज केलेली कारवाई पोलिस ठाण्याच्या दारात बसूनच पोलिसांनी केली. यावेळी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अनेकांकडे वाहनांची कागपत्रे असली तरी त्यांना अनेक तासांसाठी ठाण्यात थांबावे लागल्याने त्रास सहन करावा लागला. मात्र असे असले तरी चौकशीअंती पोलिसांनी वाहनधारकांना सोडून दिले.

कारवाई ठाण्याच्या दारातच!

आज वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई चा उपक्रम कौतुकास्पद असला तरी अशी कारवाई शहरातील उड्डाणपूल, इटके कॉर्नर, अंबाजोगाई रोडवर होणे आवश्यक आहे. पोलिस ठाण्याच्या समोर प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात आणि नेमके याच ठिकाणी कारवाई केल्याने चोर सोडून संन्याशाला दिल्यासारखे होत असल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे.

जड वाहनांवर कारवाई आवश्यक

वाहन चोऱ्या रोखण्यासाठी दुचाकी वाहनांवर कारवाई आवश्यक आहे हे तितकेच खरे आहे. मात्र शहरातून सर्रासपणे सुरू असलेली जड वाहतूक, राखेची उघड्यावरून केल्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, अवैद्य प्रवासी वाहतुकीमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. या वाहनांवरही पोलिसांनी कारवाई करावी, ही खरी गरज असून, फक्त टार्गेट पूर्ण न करता त्या कारवाईचा जनतेला फायदा होईल.