नरखेड तालुक्यातील नागरिकांनी जाणून घेतले जलसंधारणाचे महत्व – ऊमठा गावाची शिवार फेरी करून केले गाव पाणीदार करण्याचे नियोजन

0
1708
Google search engine
Google search engine

नरखेड तालुक्यातील दुष्काळाला हरवण्यासाठी गावकऱ्यांनी केला संकल्प

गाव पाणीदार करण्यासाठी लोकचळवळीमध्ये युवकांचा वाढता प्रतिसाद !

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी-

नरखेड तालुक्यातील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातील ९२ गावांनी सहभाग घेतला असून तालुक्यातील सर्वच गावातील नागरिकांना प्रशिक्षित करण्याचे काम पाणी फाउंडेशन तर्फे होत आहे नरखेड तालुक्यातील सर्वच प्रशिक्षणार्थ्यांना विशेष असे प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य पाणी फाउंडेशनच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून होतांना दिसत आहे . तालुक्यातील सर्वच नागरिकांना विशेष प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रातील भीषण पाणी समस्या निकाली काढून आपले गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांना पणलोटांचे उपचार कसे व कुठे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करून , माती परीक्षण , शोष खड्डे , आग पेटी मुक्त शिवार , जल बचतीचे कार्य , सेंद्रिय शेती , जलसंधारण , मनसंधारण , यासह खेळांच्या माध्यमातून बौद्धिक ज्ञान , यासह विशेष महत्वाच्या विषयांवर पाणी फाउंडेशन ची तज्ञ प्रशिक्षक मंडळी मार्गदर्शन करून गावकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम करीत आहे .

नरखेड तालुक्यातील नागरिकांनी शिवार फेरी करून पानलोटाचे उपचार कोठे आणि कश्या पद्धतीने करावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनने तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सत्यमेव जयते टीमने पाणी फाउंडेशन ची स्थापना केली आणि याच माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ‘ सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच आयोजन केल गेलं. या स्पर्धेच हे तिसरं वर्ष. या स्पर्धेअंतर्गत गावातून श्रमदानाच्या माध्यमातून पाणलोट आणि मृदा संधारणाची कामे केली जातात. या वर्षी महाराष्ट्रातील ७५ तालुक्यांची स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या ७५ तालुक्यांपैकी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील नागरिक जलसंधारणाची चळवळ आपली जबाबदारी म्हणून पार पाडतांना दिसत आहे.

विशेष म्हणजे पाणी फाउंडेशन च्या प्रशिक्षणामुळे गावक-यांच्या उत्साहात भर पडली आणि त्यांच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाली त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या नरखेड तालुक्यतील प्रत्येक गावात पाणलोट नियोजनासाठी आणि तांत्रिक सहकार्यासाठी जलसंधारणाची चळवळ गावकऱ्यांनी उत्साहात सुरू केली .

गावाने पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब गावातच अडवला तर पाण्याची भूजल पातळी नक्की वाढेन आणि गाव आपला पाण्याचा दुष्काळ संपवू शकेल .त्याकरिता पाण्याची भीषण समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय पद्धत वापरणे गरजेचं आहे .

नरखेड तालुक्यातील ३०९ नागरिकांनी पाणी फाउंडेशनचे पाणलोट आणि जलसंधारण या विषयातील तज्ञांकडून प्रशिक्षण घेतलं आणि कठीण वाटणारा पाणलोट व्यवस्थापन हा विषय हळूहळू समजायला सुरुवात झाली. नरखेड तालुक्यातील गावक-यांचा उत्साह आणि दुष्काळाला हरवण्याची तळमळ बघून नरखेड तालुक्यामध्ये जलसंधारणासोबत मानसंधारण मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .

नरखेड तालुक्यातील प्रशिक्षण घेऊन आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी उमठा येथील गावाची शिवार फेरी करून जल संधारणासाठी कुठले उपचार कुठल्या जागी वापरता येईल यावर बरीच चर्चा झाली. प्रत्यक्ष शिवारफेरी करून आल्यामुळे आणि पाणलोटाचे जवळून निरीक्षण केल्यामुळे कुठल्या जागी कुठले उपचार करायचे याची सविस्तर माहिती पाणी फाउंडेशन च्या तज्ञ मंडळींकडून देण्यात आली. या कामाच्या माध्यमातुन तालुक्यातील गावकऱ्यांना पाणी प्रश्न समजून घेण्याची संधी मिळाली. पाणी प्रश्न किती महत्वाचा? दुष्काळाचा गावातील लोकांच्या जीवनावर कसा परिणाम पडतो हे गावकऱ्यांना नव्याने अनुभवायला मिळाल. उमठा येथे झालेल्या कार्यशाळेमुळे नरखेड तालुक्यातील गावकऱ्यांना पाणलोटासंदर्भातल्या तांत्रिक बाबी शिकायला मिळाल्या. गावात काम करतांना कुठल्या अडचणीला तोंड द्यावे लागेल याची प्रचीती गावकऱ्यांना गावात प्रत्यक्षात शिवार फेरी करून काम केल्यानंतर आली. सोबतच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागातून गावाचे बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात हे जाणवले. पाणलोट व्यवस्थापनासोबतच तालुक्यातील समाजजीवन, शेती करण्याची पद्धत, बेरोजगारीचा प्रश्न नागरिकांना जवळून अनुभवला मिळाला.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे , पाणी फाउंडेशन चे तांत्रिक ट्रेनर प्रविण बागडे , तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , व भरसिंगी , दातेवाडी , बरडपवनी , आग्रा , अंबाडा देशमुख , लोहारा , येथील सर्व प्रशिक्षणार्थ्यांसह उमठा येथील सरपंच , उपसरपंच , गावातील नागरिक तसेच तालुक्यातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती .