पाण्याच्या समस्येवर चांदूर रेल्वे नगर परीषदच उदासिन >< विरोधी पक्ष गटनेता श्री संजय मोटवानी यांचा आरोप

0
1245

पाणी पुरवठा समितीची तीन महिण्यात एकही सभा नाही

 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) –

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. उन्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न सगळीकडेच पेटत असतो. मात्र शहरात पाणी टंचाईचा प्रश्न अधिक तिव्र होऊ नये यासाठी गेल्या ५-६ महिण्यांपासुन विरोधी पक्ष गटनेता संजय तेजुमल मोटवानी हे विहीरी व हँडपंपची साफसफाई व दुरूस्तीसाठी मुख्याधिकाऱ्यांना सतत निवेदन देऊन पाठपुरावा करीत होते. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न अधिक तिव्र होतांना दिसत आहे. त्यामुळे शहरातील पाण्याच्या समस्येवर नगर परीषद प्रशासनच उदासिन असल्याचा आरोप संजय मोटवानी यांनी केला असुन याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी, पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याकडे केली आहे. तसेच पाणी पुरवठा समिती स्थापन झाल्यापासुन एकही सभा झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

शहरातील प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक संजय मोटवानी यांनी त्यांच्या प्रभागातील वापरण्यात येत नसलेल्या विहीरींची साफसफाई व दुरूस्तीची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासुन मुख्याधिकाऱ्यांकडे केली. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी या पत्राला केराची टोपली दाखविली. सद्या उन्हाळा सुरू झाला असतांना शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मालखेड तलावाची पाण्याची पातळी खुपच कमी गेली आहे. यामुळे आता शहरवासीयांना ७-८ दिवसांनी गढुळ पाणीपुरवठा होत आहे. एवढ्या कालांतराने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे शहरवासीयांचे हाल होत आहे. मागणी केलेल्या तसेच शहरातील संपुर्ण वापरण्यात येत नसलेल्या विहीरी व नादुरूस्त हँन्डपंपची तेव्हाच दुरूस्ती व साफ सफाई केली असती तर शहरवासीयांना त्याचा या काळात आधार झाला असता. शहरात निर्माण झालेल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर नगर परीषद प्रशासनाचे बेजबाबदार पणाचे धोरणच दोषी असल्याचा आरोप संजय मोटवानी यांनी केला आहे. तरी शहरातील संपुर्ण विहीर व हँडपंप ची तत्काळ दुरूस्ती करावी तसेच पाण्यासारख्या मुख्य समस्येबाबत बेजबाबदार असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संजय मोटवानी यांनी केली आहे. अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा सुध्दा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. यासोबत पाणी पुरवठा समिती स्थापन झाल्यापासुन म्हणजेच तीन महिण्यांपासुन एकही सभा झालेली नाही. पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत असतांना एकही सभा न होणे ही एक शहरासाठी दुर्भाग्याची बाबच म्हणावी लागेल असेही संजय मोटवानी यांनी म्हटले व याची सुध्दा एक वेगळी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नागरीकांच्या तक्रारींची व्यक्तिशः दखल – सभापती गायकवाड

         पाणी पुरवठा समितीची एकही बैठक झाली नसली तरी ज्या दिवशी सभापती पदाची सुत्रे स्विकारली त्या दिवसापासून ते आजपर्यंत सतत शहरातील येणाऱ्या तक्रारींची व्यक्तिशः दखल घेऊन समस्यांचे निराकरण करतो आहे व पाणीपुरवठा समितीमध्ये घेण्यात येणाऱ्या आर्थिक विषयाची बाब ही अत्यंत कमी असल्यामुळे त्या प्रकारचे सगळे सरकारी इस्टीमेट व प्रशासकीय मान्यता ही व्यक्तिशः जिल्हाधिकारी साहेबांना भेटून सोडविण्याचा प्रयत्न करतो आहे. सभापती आहे तोपर्यंत शहरातील नागरीकांना स्वच्छ व चांगले पाणी देण्याची हमी आपल्या पुढे देतो. परंतु पाण्याच्या वापर जपून करा हाच एक छोटा संदेश शहरवासीयांसाठी असल्याचे मत पा.पु. सभापती वैभव उर्फ गोटु गायकवाड यांनी व्यक्त केले.

पाणी पुरवठा अभियंता यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी

      प्रभाग क्र. १ मधील नगरसेवक प्रमोद वानरे यांनी आपल्या प्रभागात दुषीत व किडेसदृष्य पाणीपुरवठा होत असतांना याबाबत पाणी पुरवठा अभियंता मॅडम यांना जाब विचारला. मात्र त्यांनी उलटसुलट उत्तरे देत नगरसेवकाचा जनतेसमोर अपमान केला. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर हक्कभंग दाखल करून तातडीने निलंबीत करण्याची मागणी प्रमोद वानरे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केला आहे. सदर तक्रार करताच मॅडम मेडीकल रजेवर गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता पाणी पुरवठ्याचा प्रश्न कोण हाताळणार हा सुध्दा मोठा पेच उपस्थित झाला आहे.