जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे एसीबीच्या जाळ्यात

0
876

जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे एसीबीच्या जाळ्यात

बीड: नितीन ढाकणे

जिल्ह्यातील सात व्यायामशाळांच्या बांधकामाचे मंजूर अनुदान खात्यावर टाकण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा गजानन खुरपुडे यांच्या सांगण्यावरून ८० हजाराची लाच स्वीकारताना क्रीडा कार्यालयातील शिपाई फईमोद्दिन अल्लाउद्दिन शेख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने आज दुपारी रंगेहाथ पकडले.

गेवराई तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील मावलाई क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा या संस्थेसहित जिल्ह्यातील इतर सहा संस्थांना नवीन व्यायामशाळेच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडेने सदरील व्यायामशाळांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ३ लाख रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला होता. हि सर्व रक्कम प्रत्येक व्यायामशाळेच्या बँक खात्यावर टाकण्यासाठी खुरपुडे आणि शिपाई फईमोद्दिन शेख याने एकत्रित दोन लाखांच्या लाचेची मागणी करून सध्या ८० हजार स्वीकारण्याचे मान्य केले. याची तक्रार एसीबीच्या बीड शाखेस प्राप्त झाली. तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने आज दि. ३ एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या परिसरात सापळा रचून शिपाई फईमोद्दिन अल्लाउद्दिन शेख याला ८० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी खुरपुडे आणि शिपाई फईमोद्दिन शेख याच्यावर बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.


हि कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस कर्मचारी दादासाहेब केदार, विकास मुंडे, प्रदीप वीर, राकेश ठाकूर, अमोल बागलाने, मेहेत्रे यांनी पार पाडली.