माळी समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

205

अरणच्या मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला माळी बांधवांना शब्द

भक्त निवास बांधकामासाठी जाहीर केला एक कोटीचा निधी

:नितीन ढाकणे:  दि. १३ —-विकासापासून लांब राहिलेल्या समाजातील छोट्या-छोट्या जाती व वंचित घटकांनी एकत्र येवून मोठी ताकद उभी करण्याची आज खरी गरज आहे, वाढत्या जातीवादाला संपवायचे असेल तर हे करावे लागेल असे सांगून मी मंत्री असले तरी सरकारी भूमिकेला वाचविण्यासाठी तुम्हाला कधी अंतर देणार नाही असा विश्वास व्यक्त करत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी तुमच्या पाठिशी मी भक्कमपणे उभी आहे, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही माळी समाज मेळाव्यात बोलतांना दिली.

श्रीक्षेत्र अरण येथे सावता परिषदेच्या वतीने आज ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळी समाज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. मनीषा चौधरी तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. अतुल सावे, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, संत सावता माळी यांचे वंशज, रमेश महाराज वसेकर, नामदेव राऊत, अभय आगरकर, शंकर वाघमारे, मयूर वैद्य आदी उपस्थित होते.

संत सावता महाराजांच्या समाधीला चंदनाची उटी लावण्याचा आज कार्यक्रम झाला, त्याचा धागा पकडून ना. पंकजाताई मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या की, ईश्वरालाही भक्तांच्या मनाची लाही थांबवण्यासाठी हे करावे लागते. अनेक वेळा जनतेच्या मनात निर्माण होणारे विचारांचं काहूर शांत करण्यासाठी त्याला सामोरे जाणं हे नेतृत्वाचं कर्तव्य असतं. लोकांच्या मनात काय आहे हे ओळखून मी काम करते. समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी अनेकदा विषाचे घोट प्यावे लागतात. ज्यांनी मला त्रास दिला त्यांनाही मी वंदन करते, माझ्या मनात कधी कोणाविषयी द्वेष नसतो.

सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नांव कायम ठेवण्यासाठीच आपण राजकारणात आहोत असे सांगून त्या म्हणाल्या की, मुंडे साहेबांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना पुढे आणून त्यांचा सन्मान वाढवला. प्रस्थापितांविरूध्द बंड पुकारून ओबीसी समाजाला न्याय दिला. तेच काम मला पुढे न्यायचे आहे. माळी समाज शांत व संयमी आहे, समाजाची बाग मी उजडू देणार नाही. मुंडे साहेबांनी तुम्हाला दत्तक घेतले होते, आता तुम्ही मला दत्तक घ्या, विश्वास ठेवा ही लेक तुमचा सन्मान वाढविल्याशिवाय राहणार नाही.

*कल्याण आखाडे यांना ताकद देणार*
———————————–
कल्याण आखाडे यांनी समाजाची शक्ती चांगल्या प्रकारे एकवटली आहे. कुठलेही पद नसतांना हा माणूस एवढे मोठे काम करत आहे. त्यांच्यामुळे मला बीड जिल्हयात चांगले काम करता येते. आखाडे यांना मोठी शक्ती देण्याचे काम मी करणार आहे असे सांगून ना. पंकजाताई मुंडे यांनी पुढील मेळाव्यापूर्वी समाजाला एक चांगली बातमी देईल असे म्हटले.

*भक्त निवासाला एक कोटी*
——————————
अरण तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून रस्ते व मुलभूत सोयी करिता मोठा निधी आपण दिला आहे. याठिकाणी भक्त निवास बांधकामासाठी २५ लाखांची मागणी आलेली असतांना ना. पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात याचे स्वागत केले.

*क्षणचित्रं*
————
• ना. पंकजाताई मुंडे यांचे अरण येथे सकाळी खास हेलिकाॅप्टरने आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर मोठी गर्दी झाली होती.
• संत सावता महाराजांच्या जन्मस्थळाला वंदन करून त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.
• अरण येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला. आ. मनीषा चौधरी, सरपंच सुरेखा इंगळे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
• ना. पंकजाताई मुंडे यांचे मेळाव्यात समाज बांधवांनी जोरदार स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून व भाजीपाल्याचे टोपले व भला मोठा पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. मुंडे साहेब अमर रहे च्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडले.
• आ. पंकज भुजबळ मेळाव्याला उपस्थित नव्हते याचा धागा पकडून ना. पंकजाताई म्हणाल्या की, पंकज हे माझ्या धाकट्या भावासारखे आहेत. पंकज आले नसले तरी येथे पंकजा उपस्थित आहे. समाजासाठी त्यांना माझे नेहमीच सहकार्य आहे व राहील असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
• अरण येथे येताच ना. पंकजाताई मुंडे यांचा कंत्राटी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व कृषी सेवकांना मागण्या मंजूर केल्याबद्दल जंगी सत्कार केला.
• मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी एकच गर्दी केली होती.
●●●●

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।