चारच महिलांनी केली वॉटर कप स्पर्धेच्या कामाला केली सुरुवात – ज्यांचं हातावर पोट आहे; अशांना वाटतंय आपलं गाव पाणीदार व्हावं !

0
1225

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी :-

नरखेड तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या नरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर डोंगरात वसलेले २३७ लोकसंख्या असलेल्या खलालगोंदी येथिल महिला कु पल्लवी रामटेके , सिंधू कोकाटे , सुनीता सहारे , कांचन रामटेके , या चारच महिला श्रमदान करीत आहे. या चारही महिलांचा श्रमदानात सहभाग वाढावा म्हणुन अभिनव शक्कल लढवित आहे. सांडपाण्याचा शोष खड्डा करणाऱ्या महिलांचे शोषखड्डे या चार महिलांनी स्वतः श्रमदानातून ८ शोषखड्डे तयार करून दगडी बांध श्रमदानातून तयार करीत आहेत.

नरखेड पासून शेवटच्या टोकावर असलेल्या खलालगोंदी या गावात राहणाऱ्या कु पल्लवी रामटेके , सिंधू कोकाटे , सुनीता सहारे , कांचन रामटेके चारही महिलांची दररोज मोलमजुरी केल्याशिवाय घरात चुल पेटत नाही. या तीनही महिलांनी गव्हांनकुंड येथील प्रशिक्षण केंद्रावर चार दिवसाचे वॉटर कप सर्धेचे प्रशिक्षण घेतले आणि आता माझे गाव पाणीदार करायचेच, पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब जिरवायचा आणि जलसंवर्धन, माती संवर्धना बरोबर वृक्ष लागवड करायचा हा संकल्प केला. त्यानी गावात येऊन लोकांनी श्रमदान करण्यासाठी लोकांना विनंती केली; पण प्रतिसाद मिळेना! कोणी मदत करण्यासाठी पुढे येत नसल्याचे पाहून दुःखी झाल्या; पण त्या खचल्या नाहीत. मग या चारही महिलांनी कमरेला पदर खोचुन हातात टिकाव, फावडे आणि टोपले घेऊन कामाला लागल्या . दररोज सकाळी वस्तीवर शोष खड्डे करण्यासाठीचे खड्डे खोदायला सुरुवात केली. आणि स्वतः घाम गाळून पाणी बचतीच्या कामात स्वतः राबत आहेत.

तसेच खलालगोंदी येथील पल्लवी रामटेके , सिंधू कोकाटे , सुनीता सहारे या तिघीही पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेऊन आल्या. नंतर त्यांनी गावात ग्रामसभा घेतली. महिलांना विविध माध्यमातून महिलांना एकत्र केले. आपण सगळ्याजणी मिळून गावासाठी काम करू. आपल्या एकीतून जलसंवर्धन करू. असे सांगितले. पण कोणीच ऐकेना. कोणी श्रमदान करण्यासाठी पुढे येईना! मग त्या चौघीनी असा निश्चय केला की, आपण चौघीनी मिळुन दररोज गावातील सांडपाण्याचे शोषखड्याचे खोदकाम करायचे आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. मात्र एवढं काम चारच महिला कसं करणार? या चारही महिला मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. तरीही या चारच महिला पाणी फाउंडेशनच्या कामात श्रमदान करून लोकसहभाग वाढविण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे . आपले गाव पाणीदार करण्यासाठी त्यांनी ही कल्पना आपल्या घरातील कर्त्या मंडळींना सांगितली. त्यांनी पण या महिलांना दुजोरा दिला. ज्या महिला शोष खड्डा करण्यास तयार होत आहेत त्यांना शोषखड्डा या चार महिलांनी स्वतः श्रमदान करून मोफत शोषखड्डे खोदून दिले हे विशेष .

अशा प्रकारे नरखेड तालुक्यातील महिला माती अडवा आणि पाणी जिरवा व जलसंवर्धन करून पाण्याने गाव श्रीमंत बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या खारीच्या वाट्यात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , अतुल तायडे , व सर्व प्रशिक्षक टीम हे मार्गदर्शन करीत आहेत.

मी आता मागे हटणार नाही माझ्या एकटीच काम आज जरी छोटे वाटत असले तरी मला यश येईलच असा मला आत्मविश्वास वाटतोय. -: कु पल्लवी रामटेके

आम्हाला जरी पुरुष मंडळी सहकार्य करीत नसले तरी आम्ही आता महिलांना सोबत घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आमच्या सोबत येणाऱ्या महिलांना सोबत घेऊन गावात जलक्रांती घडवून गाव पाणीदार नक्कीच करू असा विश्वास आम्हाला वाटतो -: सिंधू कोकाटे