मोहा गावाला प्रोत्साहन देण्यासाठी परळी पत्रकार संघ व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग

0
801
Google search engine
Google search engine

गावाला पाणीदार करण्यासाठी मोहा येथे शेकडो हातांनी श्रमदान

 मोहा गावाला प्रोत्साहन देण्यासाठी परळी पत्रकार संघ व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग

परळी प्रतिनिधी: दिपक गित्ते व नितीन ढाकणे

परळी तालुक्यात वॉटरकप स्पर्धेला जोमात सुरुवात झाली आहे. आपल्याच गावाचा प्रथम क्रमांक कसा येईल याकडे लक्ष देऊन लहान-थोरांसह गाव-गावातील कुटुंब श्रमदान करीत आहेत. बक्षिसापेक्षा आपले गाव पाणीदार होऊन अनेक वर्षांचा दुष्काळ संपणार आहे ही भावना निर्माण झाली आहे. या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या तालुक्यातील मोहा येथे दि.21 एप्रिल रोजी महसुलचे कर्मचारी तर आज दि.22 एप्रिल रोजी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रमदान करण्यात आले.


मोह हे गाव डोंगरकुशीत वसलेले गाव असून या गावातील कामांमुळे इतरही काही गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. हे गाव पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत उतरले असून श्रमदानासाठी गावातील शेकडो हात कष्ट करीत आहेत. त्यांच्या या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी दि.21 रोजी तहसीलदार शरद झाडके यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले, तर आज दि.22 एप्रिल रोजी परळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय काळे, तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने, जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, जगदीश शिंदे, महादेव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, ऍड, गिरीश नरवणे, अरविंद चौधरी, चंद्रशेखर फुटके, दिनेश घोडके, भगवान आरबुने, संदीप बोनगे, सतिश चौधरी यांच्यासह अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गावाला पाणीदार करण्यासाठी मोठ्यांच्या खांद्याला खांदा लावून लहान मुले श्रमदानात सहभागी होत असून, यात महिलांचाही सहभाग मोठा आहे.

गावच्या जावयांचाही सहभाग
वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या मोहा गावात जलसंधारणाची मोठी कामे श्रमदानातून करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून त्यांना साथ देण्यासाठी गावातील लग्न झालेल्या मुली व जावई उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. जावई श्रमदानाला आल्यानंतर खरोखरची नसली तरी पाणी फाउंडेशनच्या खास शैलीत त्यांना तोंडी फुले देऊन स्वागत करण्यात येते.

कामाच्या ठिकाणी मनोरंजन
ज्या ठिकाणी जलसंधारणाची कामे श्रमदानातून होत आहेत त्या ठिकाणी मोठ्या आवाजात पाणी फौंडेशनने तयार केलेली स्फूर्तिगीत लावण्यात येते. अगदी हसत-खेळत श्रमदान होत असून, पाणी फौंडेशनचे समन्वयक प्रशांत ईखे व प्रशिक्षक ज्ञानेश्वर इधाते हे कामाबाबत सर्व ग्रामस्थांना सतत मार्गदर्शन करीत आहेत. गावातील एकूण 400 जण श्रमदानाला येत असून दिवस-दरदिवशी संख्येत वाढ होते आहे.