आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत संविधानिक हक्क अधिकाराच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत – राजरत्न आंबेडकर

0
1038
बहुजन जन-जागृती परिषदेत डॉ.आंबेडकर,म.फुले व बसवण्णा यांची संयुक्त जयंती साजरी
बीड,परळी वैजनाथ : नितीन ढाकणे
आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत संविधानिक हक्क अधिकाराच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु तथा भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी सांयकाळी  दि. 23 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर पुतळा प्रांगण, रेल्वे स्टेशन याठिकाणी आयोजित भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फूले, नागवंशी बसवण्णा यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित बहुजन जन जागृती परिषदेत केले.
सविस्तर माहिती अशी की, या परिषदेचे उद्घाटन औष्णिक विद्युत केंद्राचे अधिक्षक अभियंता व्ही.टी. वडमारे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलिस अधिक्षक आनंद दिवे, महाव्यवस्थापक ए.बी. वानखेडे, पोलिस निरीक्षक सुरेश खाडे, न.प.चे कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे, स्टेट बँकेचे व्यवस्थापक प्रभाकर सहारे, रामनाथ पोटे, सिटी सर्व्हेचे आर.आर. देवकते, भारतीय बौध्द महासभेचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ खांडेकर, भा.बौ.महा.चे युवक प्रदेश संघटक विवेक झिंजुर्डे, आर.एच.व्हावळे, महेंद्र रोडे, बी.बी. गायकवाड, इंजि.भगवान साकसमुद्रे, जयवर्धन सुर्यवंशी, अनिल चिंडालीया, जयस्तंभ-भीमा कोरेगाव लढाईची गौरव गाथा आणि फुलेे-आंबेडकरी दृष्टीकोन या पुस्तकाचे लेखक संयज गायकवाड, उपजिल्हा रूग्णालयाच्या मेट्रन नीता मगरे, महेश मुंडे, बाबा शेख, पत्रकार संघाचे दत्तात्रय काळे, भीम आर्मीचे राज्य संघटक मनोहर व्हावळे, संजय पाडमुखे, चंद्रमणी वाघमारे, मनीषाताई जगतकर, मीराताइ उजगरे आदिंची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कौठळीचे सरपंच मधुकर झिंजुर्डे यांनी केले.
राजरत्न आंबेडकर पुढे  म्हणाले की, आज भारताची लोकशाही धोेक्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिलेले अधिकार संसदेत कायदे करून नष्ट केले जात आहेत. या देशातील प्रस्थापित पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे वेगवेगळे पक्ष नसून ते एकच आहेत. ते मिळूनच लोकांना गुलाम ठेवण्याचे कारस्थान करत आहेत. आमच्या मुलांना सरकारी शाळेत गुलाम बनवण्याचे शिक्षण दिले जात आहे तर दुसरीकडे ब्राम्हण बनियासाठी कॉन्वेटंला मान्यता देण्यात येत आहे. सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी भविष्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
देशात जी अराजकता माजत आहे त्याला शत्रु जसा कारणीभूत आहे तसेच जनता सुध्दा कारणीभूत आहे. आपल्याकडे असलेल्या मत देण्याचा अधिकार आपण योग्य प्रकारे न वापरता तो आपण फालतू गोष्टींसाठी विकता आहात. असे न करता मताची ताकत आपण दुसर्‍याला राजा करण्याकरता न खर्चता स्वतः राजा बनण्यासाठी त्याचा उपयोग करा असे ते म्हणाले.
बहुजनांच्या हक्काच्या रक्षणासाठी भविष्यामध्ये देशभरात आंदोलन उभे केले जाईल. त्यासाठी बहुजन समाजाने साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. संजय गायकवाड म्हणाले की, नेता कितीही जरी मोठा असला तरी आपले स्वातंंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करू नये आणि त्याच्यावर एवढा विश्‍वास ठेवू नये की तो तुमचेे हक्क-अधिकारही हिरावून घेईल असे बाबासाहेबांनी म्हटले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सदाशिव कांबळे व पप्पु रोडे यांनी केले, प्रास्ताविक प्रा. दयानंद झिंजुर्डे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. ब्रम्हानंद कांबळे यांनी केले.