दै.बीड नेताचे संपादक तथा शेतकरी प्रचंड सोळंके कलेक्टर कचेरीसमोर उपोषणास बसणार

0
697
Google search engine
Google search engine

दै.बीड नेताचे संपादक तथा शेतकरी प्रचंड सोळंके कलेक्टर कचेरीसमोर उपोषणास बसणार

बीड, दि.२५ (प्रतिनिधी):
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी पिक विमा भरला मात्र त्याचा लाभ दोन शेतकर्‍यांना मिळाला नसल्याने विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी ३० एप्रिल रोजी दै.बीड नेताचे संपादक तथा शेतकरी प्रचंड सोळंके हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहेत.

या बाबतचे निवेदन त्यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिले आहे.
पत्रकार तथा शेतकरी प्रचंड नानासाहेब सोळंके रा.चिखली ता.धारूर व तारामती बालासाहेब कुडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा दिंद्रूड येथे २०१६-१७ करिता पिक विमा भरला होता. सदरील शाखेने भरलेल्या पिक विम्याची रक्कम मुख्य शाखेकडे वर्ग केली नसल्याने संबंधीत शेतकर्‍यांची नावे  पिक विम्याच्या यादीत आले नाहीत. संबंधीत शेतकर्‍याकडे विमा भरल्याच्या पावत्याही आहेत. आता मात्र बँकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. आधिच शेतकरी कर्जबाजारी आणि नापीकीमुळे आत्महत्या करत असतांना याकडे प्रशासकीय अधिकारी गांभिर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी प्रचंड सोळंके हे ३० एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहेत.

याबाबतचे निवेदन त्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पालकमंत्री पंकजाताई मुंडे आ.आर.टी.देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अदित्य सारडा, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, धारूरचे तहसीलदार, शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि जिल्हा बँकेचे मुख्य अधिकारी यांना पाठवले आहे.