सुवर्णपदक विजेता राहूल आवारेला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची एक लाख एक्कावन्न हजाराची मदत

0
1224

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडेंनी पालकत्व स्विकारत केले खास अभिनंदन

बीड: नितीन ढाकणे

मोठ्या बहिणीकडून मिळालेली शाबासकी मला लाख मोलाची – राहूल आवारे

दि. २६ राष्ट्रकुल स्पर्धेत सुर्णपदक पटकावणारा बीडचा भूमीपुत्र राहूल आवारे याला पुढील प्रशिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजाराची मदत आज देण्यात आली. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी राहूलचे पालकत्व स्विकारत त्याचे खास अभिनंदन केले व आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. राहूलने यावेळी बोलताना मोठ्या बहिणीकडून मिळालेली मदत मला लाख मोलाची आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरूषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत राहूलने कॅनडाच्या खेळाडूला चीतपट करत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या अतुलनीय कामगिरीमुळे महाराष्ट्रा बरोबरच बीड जिल्हयाचीही मान अभिमानाने उंचावली. या यशाबद्दल राहूलने आज मुंबई येथे पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांची भेट घेवून स्पर्धेत पटकावलेले सुवर्णपदक मोठ्या अभिमानाने त्यांना दाखवले. मोठी बहिण म्हणून आपण माझ्या पाठिमागे खंबीरपणे उभा रहावे अशी इच्छा राहूलने यावेळी व्यक्त करताच पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्याचे पालकत्व स्विकारत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजाराची आर्थिक मदत देखील त्याच्याकडे लगेच सुपूर्द केली. माझ्या जिल्हयाच्या खेळाडूने मिळवलेल्या यशाचा मला अभिमान वाटतो असे सांगून आगामी ऑलिम्पिकसाठी परदेशात प्रशिक्षण घेण्याकरिता संपूर्ण मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला. जिल्हयात उत्कृष्ट कुस्तीपटू तयार व्हावेत यासाठी अॅकॅडमी स्थापन करण्याची सूचना करून या अॅकॅडमीलाही संपूर्ण मदत करू असे त्या म्हणाल्या.

शासकीय नोकरीसाठी मुख्यमंत्र्यांशी भेट

महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल राहूल आवारे यांस शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राहूलची भेट घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्याचा सत्कार करून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राहूलला लवकरच शासकीय सेवेत घेवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अर्जून पुरस्कार विजेते काका पवार, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर गोविंद पवार, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, राष्ट्रीय खेळाडू महेश घुले आदी यावेळी उपस्थित होते.

मोठ्या बहिणीकडून मिळालेली
शाबासकी माझ्यासाठी महत्वाची – राहूल

मोठ्या बहिणीकडून मिळालेली शाबासकी मला लाख मोलाची आहे अशी प्रतिक्रिया राहूल आवारे याने याप्रसंगी व्यक्त केली. जिल्हयातून अनेक नेत्यांनी माझे अभिनंदन केले, पण सर्वप्रथम पंकजाताईनीच मला बोलावले. माझा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांकडे घेवून गेल्या, सरकारी नोकरीसाठी शब्द टाकला. माझे पालकत्व स्विकारून मला मदतीचा हात दिला, हिच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे अशा शब्दांत राहूलने आपल्या भावना व्यक्त केल्या.