वेळ पडल्यास कलेक्टर, सीओ यांना कोर्टात खेचणार – राजकीय दबावामुळे घरकुल घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात – मुख्याधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी

0
914
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 

    चांदूर रेल्वे नगर परीषदमधील घरकुल घोटाळा उघडकीस आणण्यासाठी शहरातील जेष्ठ नागरीक गौतम अण्णाजी जवंजाळ गेल्या १० वर्षांपासुन लढा देत आहे. सदर कारवाई करण्यासाठी अधिकारी राजकीय दबावामुळे टाळाटाळ करीत असून आताही जाग न आल्यास लोकवर्गनीतुन जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांना कोर्टात खेचण्याचा इशारा गौतम जवंजाळ यांनी वृत्तकेसरी सोबत संवाद साधतांना दिला आहे.

 एकाच कुटुंबातील दोघांनी, तीघांनी घेतला लाभ

      घरकुल योजना ही गोर गरीब जनतेसाठी असतांना एका कुटुंबाला एकाच वेळी लाभ घेता येतो. मात्र शहरातील अनेकांनी एकाच कुटुंबातील तीन, चार या संख्येत घरकुलाचा लाभ एकाच राशन कार्डवर, एकच असेसमेंटवर, एकच टॅक्स पावती जोडुन घेतला. अनेक वेळा लाभ घेतल्यानंतर शौचालय मात्र एकच बांधले असल्याचेही दिसते. असा मोठा घोटाळा सर्वांसमक्ष झाला असतांना अधिकाऱ्यांनी मात्र मौन धारण केले आहे.

 २००८ पासुन सतत पाठपुरावा

 यावेळी बोलतांना जवंजाळ म्हणाले की, सन २००८ पासुन स्थानिक न.प. मधील घरकुल घोटाळा उघडकीस आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहो. यापुर्वी उपोषणाला बसल्यानंतर दखल देऊन तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी चौकशी करण्याचे आदेश देऊन अहवाल तयार केला होता. अहवालावरून कारवाईचे आदेश दिल्यानंतरही स्थानिक मुख्याधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सुध्दा याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप जवंजाळ यांनी केला. हे सगळे राजकीय दबावातुन घडत असल्याचेही म्हटले.

 ११० च्या वर तक्रारी, निवेदने 

 या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या १० वर्षात ११० पेक्षा जास्त तक्रारी, निवेदने शासन दप्तरी दिल्याचे जवंजाळांनी सांगितले. याशिवाय पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री अशा अनेक मंत्र्यांना तसेच राज्यपाल यांना सुध्दा जवळपास २०-२५ पत्रे पाठविली आहे. यासोबत आपले सरकार पोर्टलवर ४-५ तक्रारी नोंदविल्या. मात्र तरीही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

 तीन जिल्हाधिकारी, सहा मुख्याधिकाऱ्यांनी हाताळले प्रकरण

 सदर प्रकरण रिचा बागला, किरण गित्ते व सद्याचे अभिजीत बांगर असे तीन जिल्हाधिकारी तसेच प्रकाश राठोड, मंगेश खवले, श्री. वाहुरवाघ, गिता ठाकरे, सुमेध अलोने व आताचे रविंद्र पाटील असे ६ मुख्याधिकाऱ्यांनी हाताळले. तरीही कोणत्याही अधिकाऱ्याने गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखविले नसुन ही प्रशासनातील एक शोकांतीकाच म्हणावी लागेल असे जवंजाळ यांनी व्यक्त केले.

 आतापर्यंत दोन वेळा उपोषण

 आपल्या लढाईला यश मिळावे यासाठी गौतम जवंजाळ यांनी २०१६ मध्ये तहसिल समोर ६ दिवस उपोषण केले. त्यानंतर तब्बल ५ दिवस विहीरीत उतरून उपोषण केले ते संपुर्ण महाराष्ट्रभर गाजले. २०१७ मध्ये जलसमाधीचा इशारा दिला होता मात्र आश्वासनानंतर स्थगिती दिली होती. १० मार्च २०१८ ला उपोषणाचा इशारा दिला असता मुख्याधिकारी यांनी गुन्हे दाखल करण्याची शाश्वती दिली होती. वारंवार मिळत असलेल्या खोट्या आश्वासनाला त्रस्त होऊन शेवटी १ मे ला स्थानिक न.प. प्रवेशव्दारासमोर तिसऱ्यांदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.

 शपथपत्र व यादीवरून थेट गुन्हे दाखल होऊ शकतात

घरकुलाचा लाभ घेतेवेळी लाभार्थ्यांनी शपथपत्रे दिले. या शपथपत्रांत खोटी माहिती पुरवीली म्हणुन थेट गुन्हे दाखल होऊ शकते. याशिवाय लाभार्थ्यांच्या यादीमधील नावे तपासली असता त्यामध्येच एकाच कुटुंबातील अनेक नावे पुढे येणार असल्याचे जवंजाळ यांनी म्हटले.

दोन मुख्याधिकारी पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन आले परत

तत्कालीन दोन मुख्याधिकारी यांनी दोषींवर गुन्हे नोंदविण्यासाठी प्रयत्न केला होता. यासाठी ते पोलीस स्टेशनपर्यंत गेले सुध्दा होते. मात्र वरून आलेल्या राजकीय दबावामुळे ते परत आल्याचा आरोप जवंजाळांनी केला.

सद्याच्या चौकशी अहवालात २३ लोकांची नावे

जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात दोषी लाभार्थ्यांची १५ नावे असुन २ माजी पदाधिकारी, ५ न.प. अधिकारी, १ नागपुर येथील सर्वे एजेंसी यांचेही नाव सामाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेस-भाजप एकाच नाणाच्या दोन बाजु

यादरम्यान गौतम जवंजाळ यांनी कॉंग्रेस-भाजपावर टीकास्त्र सोडत दोनीही एकाच नाणाच्या दोन बाजु असल्याचे म्हटले. कॉंग्रेस सरकार असतांना या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले व आता भाजप सरकार सुध्दा तेच करत असल्याचे सांगितले.

प्रशासनाने पळवाट काढण्याचा प्रयत्न केल्यास कोर्टात जाणार

१ मेच्या उपोषणानंतरही प्रशासनाने पळवाट काढण्याचा प्रयत्न केल्यास २ जिल्हाधिकारी व ६ मुख्याधिकाऱ्यांना कोर्टात खेचुन त्यांच्यावरसुध्दा कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे जवंजाळ यांनी सांगितले. तसेच याच उपोषणादरम्यान आताचे मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी ते करणार आहे.

माझ्या जीवीताला धोका

अनेक वर्षांपासुन मी ही लढाई लढत आहो. महाराष्ट्रदिनी उपोषणाला बसल्यानंतर माझ्या जीवीताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मी ठाणेदारांना पत्र देऊन उपोषणस्थळी एका पोलीस कर्मचाऱ्याची सुरक्षा पुरविण्याची मागणी करणार असुन माझ्या जीवीताची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहणार असल्याचे जवंजाळांनी म्हटले.

घरकुल घोटाळ्याची लढाई सुरूच ठेवणार

घरकुल घोटाळ्यातील सर्व दोषींवर जोपर्यंत फौजदारी कारवाई होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. दोषींना घरकुलाच्या यादीतुन हद्दपार करण्याचा मानस असल्याचे गौतम जवंजाळ यांनी म्हटले.