(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्ण ओबीसी होते, त्यांना ब्राह्मण सांदिपनी ऋषींनी देव बनवले !’

0
680

गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार राजेंद्र त्रिवेदी यांचे विधान

  • धर्मशिक्षण नसल्यावर कोणीही ‘स्वतःला कळते’, या अहंकारातून विधाने करत असतो आणि त्यात ती व्यक्ती राजकारणी असेल, तर ‘आपण सर्वज्ञानी आहोत’, असेच दाखवते, त्यातील त्रिवेदी हे एक उदाहरण होय !
  • काँग्रेसच्या आमदाराने असे विधान एकवेळ केले असते, तर समजू शकले असते की, त्याला किती ज्ञान असणार ?; मात्र जेव्हा भाजपच्या आमदाराकडून असे होते, तेव्हा ते हिंदूंना अपेक्षित नसते !
  • देवतांना जातीजातींमध्ये विभागणारे नेते हिंदूंची एकजूट करून कधीतरी हिंदु राष्ट्र स्थापू शकतील का ?

 

गांधीनगर (गुजरात) – मी हे नेहमीच सांगत आलो आहे की, ब्राह्मणांनीच अनेकांना देवत्व मिळवून दिले. श्रीराम हे क्षत्रिय होते; पण ऋषीमुनींनी त्यांना देव बनवले. गोकुळात एका गुराख्याला (भगवान श्रीकृष्णाला) आपण ‘ओबीसी’ म्हणतो; पण त्या ओबीसीला सांदिपनी ऋषींनी, म्हणजे एका ब्राह्मणाने देव बनवले. मत्स्यकन्येचा मुलगा असलेल्या व्यासांनाही ब्राह्मणांनीच महत्त्व मिळवून दिले, असे जात्यंध विधान गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार राजेंद्र त्रिवेदी यांनी केले.

येथे आयोजित समस्त गुजरात ब्रह्म समाज या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या भाषणाच्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेही व्यासपिठावर उपस्थित होते.

त्रिवेदी पुढे म्हणाले की, ब्राह्मणांनी अनेक राजे घडवले. ‘अर्थशास्त्र’ ग्रंथाचे लेखक आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु आर्य चाणक्य हेही ब्राह्मण होते. त्यांनी मनात आणले असते, तर ते राजा बनले असते; पण ब्राह्मण कधीच सत्तेचा लोभी नसतो. तो नेहमीच समाजाच्या भल्याचा विचार करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही ब्राह्मण होते. त्यांच्या ब्राह्मण गुरूंचे आडनाव ते लावत असल्यामुळे ते ब्राह्मण होते. मला हे सांगायला अभिमान वाटतो की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही ब्राह्मण आहेत. ब्राह्मण समाजाने देशाला ५ राष्ट्रपती, ७ पंतप्रधान, ५० मुख्यमंत्री, ५० हून अधिक राज्यपाल, २७ भारतरत्न विजेते आणि ७ नोबेल पुरस्कार विजेते दिले आहेत.