अधिवक्त्यांनी कार्यकर्ता अधिवक्त्याच्या भूमिकेतून कार्य करावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

0
664
Google search engine
Google search engine

 

रामनाथी (गोवा)

 आपण अधिवक्ता आहोत. त्यामुळे आपले कार्य अटक झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या जामिनासाठी न्यायालयात आवेदन देणे आणि त्यांचा खटला विनामूल्य लढणे एवढ्यापुरतेच मर्यादित असते; परंतु हिंदुत्वनिष्ठांना या दोन गोष्टींविना अन्य कायदेविषयक साहाय्यही हवे असते. अशा वेळी आपण धर्मासाठी आवश्यक तेथे आणि तसे आपले वकिली कौशल्य वापरून केवळ अधिवक्ता म्हणून नाही, तर कार्यकर्ता अधिवक्त्याच्या भूमिकेतून कार्य करावे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत चौथ्या अधिवक्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर, कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एम्.पी., हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक तथा सनातन प्रभातचे समूह संपादक श्री. नागेश गाडे आणि अधिवक्ता विजयशेखर आदींसह कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधून आलेले अधिवक्ता उपस्थित होते. या वेळी अधिवक्ता अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

शंखनाद, श्‍लोकपठण, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सनातन पुरोहित पाठशाळेच्या पुरोहितांनी वेदमंत्रपठण करून शिबिराला आरंभ करण्यात आला. शिबिराचा उद्देश हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी सांगितला, तर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी करून दिला.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

आपल्याला न्यायव्यवस्थेत कार्य करतांना प्रतिदिन तणावपूर्ण स्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी आपल्याला मनुष्यजीवनाचे ध्येय, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या विचारांचा विसर पडतो. त्यामुळे या व्यवस्थेतून बाहेर पडून आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करणे आणि आपल्या प्रयत्नांची गती वाढवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात योगदान देणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र येणारच आहे. आम्हाला या पवित्र कार्यात एक पाऊल पुढे टाकायचे आहे.

अधिवक्त्यांच्या साहाय्यामुळे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे मनोबल वाढते ! – श्री. श्रीकांत पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते प्रत्यक्ष धर्महानीच्या विरोधात कृती करत असतात; पण त्यांच्यावर पोलीस खोटे गुन्हे नोंद करून त्यांचे मानसिक खच्चीकरण अनेकदा करतात. कायद्याचे पूर्ण पालन करून धर्मप्रसाराचे कार्य करतांना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून अनेकदा नाहक अडथळे निर्माण केले जातात. अशा वेळी अधिवक्त्यांनी साहाय्य केल्यास होणारा जाच अल्प होतो. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे मनोबल वाढते. त्यामुळे अधिवक्त्यांची मोठ्या प्रमाणात साहाय्यता हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपेक्षित आहे.