बोगस ‘क्रांती’करी

0
1034
Google search engine
Google search engine

भारताला स्वातंत्र्य मिळवून आता जवळपास 7 दशकं उलटली, गेल्या 70 वर्षात भारताने आर्थिक आणि सामरिक क्षेत्रात प्रचंड प्रगती केलेली आहे.

जगातील सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही म्हणून भारताची ओळख संपूर्ण विश्वात आहे, तरीही भारतात एक वर्ग असाही आहे जो प्रस्थापित लोकशाही शासनाला उलथवून हिंसक मार्गाने आपले ‘लाल’ शासन स्थापित करू पाहतो आहे. नक्षलवाद आणि नक्षलवादी.

विशेषतः जंगली आदिवासी क्षेत्रांमध्ये स्थापित आणि वाढलेली ही चळवळ समाजातल्या शोषित, पीडित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी लढत असल्याचे भासवून गरीब आणि अशिक्षित आदिवासी जनांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या मार्फत क्रांतीची स्वप्ने पूर्ण करण्यास धन्यता मानते.

1967 साली कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडून लेनिनवादी आणि मार्क्सवादी असे दोन गट पडले. ह्याच फुटीतून नक्षलवादी चळवळीचा उगम झाल्याचे मानले जाते. प्रामुख्याने माओंच्या विचारसरणीवर चालणारी ही चळवळ गरीब शेतकरी आणि आदिवासी यांच्या मदतीने प्रस्थापित उच्चवर्णीयांच्या शासन व्यवस्थेला उलथवून पाडण्याचे ध्येय ठेवते.

या चळवळीला यंदा 51 वर्ष पूर्ण होतील, या 51 वर्षांमध्ये चळवळीचा किती आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला याचा विचार केल्यास उत्तर शून्य मिळेल.

धनिक वर्गाकडून खंडणी गोळा करून त्या पैशाचा वापर आदिवासी जनतेच्या विकासासाठी करण्याऐवजी त्यांच्या हाती शस्त्र देऊन शासकीय विकासकामांना विरोध करण्याची नक्षलवाद्यांची प्रवृत्तीच आहे. एकीकडे शासकीय विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे शासन आदिवासी जनतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून आदिवासी जनतेची माथी भडकावून देण्याची कामे नक्षलवादी गेल्या कित्येक वर्षांपासून करताहेत.

उच्चवर्णीय आणि धनिकांचे प्रभुत्व असलेली ही व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी लढणारे नक्षलवादी नेते स्वतः धनिक सावकारांसारखे जीवन जगत असल्याची माहिती पुढे येतं आहे. गृहमंत्रालयाने अलीकडेच एक धक्कादायक माहिती दिलेली असून ज्यानुसार अनेक बड्या नक्षलवादी नेत्यांनी चळवळीसाठी खंडणी गोळा करून मिळवलेला पैसा आपापल्या नातेवाईकांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी वापरला असल्याचे गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आलेले आहे. ( दैनिक लोकसत्ता, पृष्ठ क्रमांक 9, दिनांक : 09/05/2018 )

त्यामुळे शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी शस्त्र उचलणारे जेव्हा स्वतः शोषण करतात तेव्हा काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. गेल्या 50 वर्षांमध्ये चळवळीने न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली त्याच शोषितांच्या रक्ताचा सडा पाडलाय, आणि त्यातून साध्य झाले काय? तर काहीच नाही. नक्षल प्रभावित क्षेत्रातला आदिवासी आजही त्याच स्थितीत आहे ज्या स्थितीत तो काही दशकांपूर्वी होता. फायदा झालाय तो फक्त या नक्षलवादी नेत्यांचा.
गेल्या काही काळात नक्षलवादाविरुद्ध सुरक्षा यंत्रणांना मिळालेलं यश नक्कीच आशादायी आहे परंतु नक्षलवादाच्या मुळाशी घाव घालण्यासाठी शासकीय आणि सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येऊन आदिवासी लोकांमध्ये या बोगस ‘क्रांती’कारांविरुद्ध प्रबोधन करण्याची आणि आदिवासी जनतेला मुख्य प्रवाहाशी जोडण्याची अत्यंत गरज आहे.

शुभम किसनराव जयसिंगपुरे
अमरावती